सिंधुदुर्गनगरी
इंटरनेट सेवा ही आता आधुनिक काळाची अत्यावश्यक गरज झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा प्रभावी वापर करून विध्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यामुळे इंटरनेट सेवा काळाची गरज ठरली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
लोरे नं.१ येथील B S N L टॉवर लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, BSNL जिल्हा प्रबंधक एस.आर. मंजे, BSNL मंडळ अधिकारी देवलीकर, जि. प. सदस्य नागेंद्र परब आदि उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कोविड-19 च्या काळात इंटरनेट मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यामुळे आता मोबाईल वर शिक्षण काळाची गरज झाली आहे. पण ग्रामीण भागात मोबाईलसाठी इंटरनेटची रेंज मिळत नाही. यासाठी टॉवर उभारणीची कामे सुरू झाली आहेत. त्याचबरोबरच ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. लोरे गावच्या मागणीनुसार रस्ते, कालवा याची कामे करण्यात येतील.लोरे गावातील विहीर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी लोरे येथील तलावाच्या कामाची पाहणी करून सदरचे काम तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दिले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, जिल्ह्यातील मोबाईल रेंजची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 104 मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 66 टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत टॉवरही लवकरच सुरू केले जातील. त्याच बरोबर लोरे फोंडा या भागाचा विकास करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.