जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
-खासदार विनायक राऊत.
सिंधुदुर्गनगरी
सामान्य जनतेचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाच्या सुमारे 40 लोककल्याणकारी योजना आहेत या योजनांची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा समिती) सभा आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकरी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी 1 लाख 20 हजार अनुदान मिळते या योजनेतर्गंत जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात 2 हजार 876 घरकुल बांधणे प्रस्तावित आहे.जिल्ह्यामध्ये ग्राम ज्योती योजनेतर्गंत कृषी क्षेत्रासाठी 3500 वीज कनेक्शन मागणी आहे. यामधील सुमारे 2700 कनेक्शन देण्यात आली आहेत. 800 कनेक्शन देणेबाकी आहे. निवासी वीज कनेक्शन अंदाजे 385 देणे बाकी आहे तीही वीज कनेक्शन तातडीने देण्यात यावीत. केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा योजनेतर्गंत 1 लाख 18 हजार 506 नळ कनेक्शनही देण्यात येणार आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोलर वीज पंप तातडीने देण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपरिषद क्षेत्रामध्ये वीज अंडरग्राऊंडचे कामे सुरु आहेत ती कामे विहित मुदतीत पूर्ण होतील यावर लक्ष केंद्रीत करावे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यावर संबंधित यंत्रणांनी भर द्यावा. कृषि विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, जास्तीत जास्त बांबू लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. कृषि विभागाने बांबू रोपांचे नियोजन करुन शेतकऱ्यांना स्वस्त किंमतीत रोपे उपलब्ध होतील असे पहावे. जिल्ह्यामध्ये आंबा, काजू यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते या पिकांना योग्य दर मिळण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर मंडळ स्थापन करता येईल का याबाबत कृषि विभागाने नियोजन करावे. असे सांगून खासदार श्री. राऊत म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळात जिल्हा प्रशासनाने अत्यंत उत्कृष्ट काम केले त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशस्वी झालो आहोत. जिल्हा रुग्ण्याालयात कमी असणाऱ्या डॉक्टर्स, अधिकारी, नर्सेस व इतर कर्मचारी यांच्या पद मागणीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांना तातडीने पाठविण्यात यावेत. जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या महामार्गाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार पध्दतीने करावे यामध्ये महामार्गाला जोडणारे रस्ते, बस स्टॉप, सेवा रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करुन केंद्र शासनाने दिलेल्या मुदतीत हा महामार्ग पुर्णत्वास आणावा. प्रस्तावित वैद्यकीय महाविलयासाठीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्यात यावेत. यावेळी खासदार श्री. राऊत यांनी जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती यांच्या समस्या संबंधित पदाधिकारी यांच्याकडून जाणून घेवून संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.
कोरोना काळामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशासनाने उत्कृष्ट काम केले आहे. कोरोनालस चांगल्या पध्दतीने प्रतिबंध घातला आहे. तथापी अजूनही कोरोना संपलेला नाही त्यामुळे जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनापासून आपला बचाव करावा. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार श्री. राऊत यांनी शेवटी केले.