*यशस्वीची झंझावाती खेळी आणि फिरकीच्या जोरावर राजस्थानचा २०० व्या सामन्यात विजय*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ३७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३२ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ४३ चेंडूत ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावाच करू शकला. शिवम दुबेने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.
मात्र, अॅडम झम्पा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीपुढे चेन्नईचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. आयपीएलमधील हा राजस्थानचा २०० वा सामना होता आणि त्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा २०० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर मोठा विजयही मिळवला. या मोसमात राजस्थानचा चेन्नईवरचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी चेपॉकमध्येही आरआरने सीएसकेवर विजय मिळवला होता.
या विजयासह राजस्थान संघ आठ सामन्यांत पाच विजय आणि १० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी केवळ तीनच सामने गमावले आहेत. यासोबतच चेन्नईचा संघ आठ सामन्यांत पाच विजय आणि तीन पराभवांसह गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसर्या स्थानावर चेन्नईपेक्षा चांगली धावगती आणि दहा गुणांसह गुजरात टायटन्स आहे. चेन्नईला पंजाब किंग्जविरुद्ध रविवारी चेपॉक येथे पुढील सामना खेळायचा आहे. त्याचवेळी राजस्थानला रविवारीच वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर २०० हून अधिक धावा झाल्या. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५० चेंडूत ८६ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. त्याने जोस बटलरला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. त्याला २१ चेंडूत २७ धावा करता आल्या. दुसऱ्या टोकाला यशस्वीने झटपट फटके मारले आणि २६ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर १४व्या षटकात तुषार देशपांडेने दोन गडी बाद केले. त्याने प्रथम कर्णधार संजू सॅमसनला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. सॅमसनला १७ चेंडूत १७ धावा करता आल्या. यानंतर यशस्वीला रहाणेने झेलबाद केले. यशस्वीला ४३ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७७ धावा करता आल्या.
शिमरॉन हेटमायर विशेष काही करू शकला नाही. आठ धावा करून महेश तीक्षानाच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी पाचव्या विकेटसाठी २१ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. ध्रुव १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३४ धावा करून बाद झाला. पडिक्कलने १३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा केल्या. त्याचवेळी अश्विन एक धाव घेत नाबाद राहिला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याचवेळी तीक्षाना आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
२०३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अतिशय संथ होती आणि पॉवरप्लेमध्ये पहिल्या सहा षटकात एक विकेट गमावून ४२ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे १६ चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
यानंतर धावगती वाढवताना ऋतुराज गायकवाडनेही आपली विकेट गमावली. त्याने २९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. अॅडम झाम्पाने दोघांनाही तंबूमध्ये पाठवले. यानंतर अश्विनच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आणि त्याने ११व्या षटकात दोन बळी घेतले. गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला त्याने आधी बाद केले. रहाणे १३ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. यानंतर त्याच षटकात अंबाती रायुडूला होल्डरने झेलबाद केले. रायुडूला खातेही उघडता आले नाही. शिवम दुबे आणि मोईन अली यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. झाम्पाने मोईनला यष्टिरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले. मोईन १२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २३ धावा काढून बाद झाला. शिवम दुबेने ३३ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली, पण ती चेन्नईला जिंकण्यासाठी पुरेशी ठरली नाही. रवींद्र जडेजा १५ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून झम्पाने तीन आणि अश्विनने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.
यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.