*चिदानंद स्वामींच्या मठात कवीवर्य आरती प्रभूंच्या स्मृतीना उजाळा.*
*आनंदयात्री वाड़्मय मंडळाचे आयोजन*
२६ एप्रिल या कवीवर्य आरती प्रभू म्हणजेच चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बागलाची राई या त्यांच्या आजोळच्या गावात त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चिदानंद स्वामींच्या मठाच्या शीतल, शांत अशा निसर्गरम्य परिसराच्या मंडपात आरती प्रभूंच्या साहित्यावर वेंगुर्ल्यातील आनंदयात्री वाड़्मय मंडळाने कल्पकतेने नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लेखिका सौ. वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम दोन सत्रात पार पडला. पहिल्या उद्घाटनपर सत्रात अध्यक्षस्थानी ह.भ.प अवधूत नाईक हे होते. प्रमुख पाहुणे कवीवर्य सुधाकर ठाकूर होते. या कार्यक्रमासाठी आरती प्रभूंचे मामा श्री बागलकर हेही उपस्थित होते. .प्रथम प्रा. सचिन परूळकर यानी प्रास्ताविक व स्वागत केले. सुधाकर ठाकूर यानी आरती प्रभूंच्या कवी म्हणून असलेल्या वाटचालीचा , त्यांच्या दुःखात्मक जाणिवेतून साकारलेल्या कवितांचा आढावा घेणारे अत्यंत भावूक असे मनोगत व्यक्त केले.अजित राऊळ यानी आरती प्रभूंच्या जीवनातील काही प्रसंगांचे कथन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना अवधूत नाईक यानी आरती प्रभूंचे आजोळ असलेल्या बागलाची राई येथील बागलकर कुटूंबियांविषयी तसेच आरती प्रभू व चिदानंद स्वामींचा मठ यांचे असलेल्या नात्याविषयी सविस्तर माहिती दिली.आरती प्रभूंच्या आप्तांकडूनच आरती प्रभूंविषयी ऐकताना श्रोतेही भावूक झाले.
दुसर्या सत्रात आरती प्रभूंच्याष कवितांचे गायन व वाचन झाले. यामध्ये सोमा गावडे यानी , ‘निःशब्द,’जान्हवी कांबळी यांनी ‘दुःख ना आनंदही’ , प्रितम ओगले यानी , ‘जाईन दूर देशा ‘
प्रसाद खानोलकर यानी, ‘ ही दोन बकरीची पोरै ‘ विनयश्री पेडणेकर यानी, ‘ सांगेल राख माझी ‘ अजित राऊळ यानी, ‘ मृत्यूत कोणी हासे इत्यादी कवितांचे वाचन केले. स्वाती सावंत यानी , ‘ ये रे घना ये रे घना हे गीत व महेश राऊळ यानी,
‘ कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ ही सुश्राव्य गीते सादर केली. वासूदेव पेडणेकर यानी पु.ल.देशपांडे यानी आरती प्रभूंवर लिहिलेल्या लेखाचे प्रभावी असे अभिवाचन केले. यानंतर प्रदीप केळुसकर यानी चिं. त्र्यं खानोलकरांच्या नाटकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. लेखक प्रसाद खानोलकर, प्रदीप केळुसकर, सुधाकर ठाकूर यानी चिं त्र्यं खानोलकर यांच्या कादंबर्या व नाटके यावर केलेली चर्चा रंगतदार ठरली. शेवटी महेश राऊळ यानी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अवधूत नाईक यानी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील साहित्यप्रेमीही उपस्थित होते.
आरती प्रभूंसारखे एक खूप उंचीवरचे कवी आपल्या परिसरात होऊन गेले. त्यांचे साहित्य रसिकांपर्य॔ंय पोहोचवण्यासाठी गावागावातून असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे मत उपस्थितांमधून व्यक्त झाले. आनंदयात्री वाड़्मय मंडळ नेहमीच रसिकांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्यामुळे रसिकांच्या या मंडळाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.