You are currently viewing रसिकता

रसिकता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच प्रमुख लेखक कवी पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*रसिकता*

आपण खूप वेळा ऐकतो की जीवनात रसिकता हवी. पण ही रसिकता म्हणजे नक्की असते तरी काय ? हे आपण आज थोडेसे जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.
तर रसिकता म्हणजे नक्की काय ?
अतृप्ततेतील वखवख म्हणजे रसिकता नाही.
किंवा प्रत्येक सुंदर फुल माझ्याच कोटाला असायला पाहिजे असे वाटणे ही सुध्दा रसिकता नाही.
दारू पिणे, दारूच्या नशेत झिंगून जाणे आणि स्वर्गात गेल्यासारखे वाटणे हे सर्व खोटे. ही रसिकता नाही.
किंवा बरेचसे लोक टीवी मध्ये मोबाइल मधे व्हॉट्सअँप मधे बुडून गेलेली दिसतात. त्यावाचून त्यांना काही सुचत नाही. हीसुद्धा रसिकता नाही.
ही आसक्ती झाली , व्यसन झाले आणि आसक्तीमध्ये किंवा व्यसनामध्ये रसिकता अजिबात नसते.

तर मग रसिकता असते तरी कश्यात ?
रसिकता म्हणजे आयुष्यात भेटणाऱ्या विविध लोकाशी , निसर्गाशी, कलाकृतीशी, साहित्याशी नाते जोडायला उत्सुक असणे. विविध अनुभव घ्यायला आतुर व उत्साहित असणे.
डोळ्यांनी सौंदर्य पहावे, कानाने सुस्वर ऐकावेत, रसनेने सुरुची अनुभवावी, मनाने सरस साहित्याचा आस्वाद घ्यावा, बुध्दीने संकल्पना मांडाव्यात.
आणि हे सर्व करीत असताना, आनंद अनुभवताना वाह अशी दाद आतुन आपोआप यावी.
त्याला म्हणतात रसिकता.
मी पणाचा विसर पडून त्या क्षणी पांच ज्ञानेंद्रिये आणि मन यांनी आनंदात न्हावून जाणे म्हणजे रसिकता.
आपले आयुष्य हा एक उत्सव आहे. ते उत्साहभरीतच असायला हवे. हा जीवनोत्सव आपणाला साजरा करता आला पाहिजे. त्यासाठी दोन गोष्टी हव्यात. जीवनशैली आणि जीवनदृष्टी. जीवनशैली म्हणजे जीवन कसे जगायचे आणि जीवन दृष्टी म्हणजे जीवन कश्यासाठी जगायचे.
भाकरी आणि फुल यामधील भाकरी जिवंत ठेवते आणि फुल कश्यासाठी जगायचे याचे प्रयोजन देते. हे फुल म्हणजे रसिकता. हे एकदा का समजले, उमगले, कळले की मग आपले जीवन हे एक सुरेल गाणे होवून जाते.

*.पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा