पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला शुभारंभ
सावंतवाडी (गौरी गोसावी) :
महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल ॲप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून हे ॲप तयार करण्यात आले आहे. कोलगावचे सुपुत्र, भाजपचे युवा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश सारंग यांनी यासाठी पुढाकार घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथील गांधी चौकात कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल ॲपचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खासदार निलेश राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डिजीटल इंडियाची संकल्पना स्थानिकांपर्यंत पोहचण्यासाठी ही संकल्पना आम्ही मांडली. अनेक अडचणींवर मात करत राज्यातील व जिल्ह्यातील ही पहिली मोबाईल ॲप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत कोलगाव ठरली. १२ प्रकारचे दाखले मिळवू शकतो. घरपट्टी पाणीपट्टी यावरून भरू शकतो. पारदर्शक कारभार यातून होणार आहे असं मत सरपंच संतोष राऊळ यांनी व्यक्त केले.
यावेळी कोलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोंसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, राजन गिरप, प्रमोद कामत, प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, संध्या तेरसे, प्रज्ञा ढवण, मोहिनी मडगावकर, बाळु देसाई, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.