*राजस्थानने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरातचा पराभव करत गेल्या वर्षीच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएलच्या १६व्या मोसमातील २३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानने पहिल्यांदाच गुजरातला पराभूत करण्यात यश मिळवले. गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले. त्यात अंतिम फेरीचाही समावेश आहे. गुजरातने सर्व सामने जिंकले होते. राजस्थानने अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.२ षटकांत सात गडी गमावून १७९ धावा करून सामना जिंकला.
राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले. शिमरॉन हेटमायरने २६ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. देवदत्त पडिक्कलने २५ चेंडूत २६ धावा केल्या. ध्रुव जुरेलने १० चेंडूत १८ आणि रविचंद्रन अश्विनने तीन चेंडूत १० धावा करत राजस्थानला विजयाच्या जवळ नेले. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात ३६ धावा करायच्या होत्या. हेटमायर, जुरेल आणि अश्विन यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीने तीन आणि राशिद खानने दोन बळी घेतले. हार्दिक पंड्या आणि नूर अहमद यांना प्रत्येकी एक बळी मिळाले.
गुजरातकडून डेव्हिड मिलरने ४६ आणि शुभमन गिलने ४५ धावा केल्या. हार्दिक पंड्याने २८, अभिनव मनोहरने २७ आणि साई सुदर्शनने २० धावांचे योगदान दिले. या पाच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी खेळली नाही.
वृद्धिमान साहा चार आणि रशीद खान एक धाव काढून बाद झाला. राजस्थानकडून संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात केवळ २५ धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
गुजरातविरुद्धच्या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचे पाच सामन्यांतून चार विजयांसह आठ गुण आहेत. पराभवानंतरही गुजरात संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यांचे पाच सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. गुजरातचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे.
शिमरॉन हेटमायरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.