चालकाचे अपघातानंतर पलायन, सुदैवाने कोणी जखमी नाही…
सावंतवाडी
भरधाव वेगाने ओव्हरटेक करणार्या टेम्पोने धडक दिल्याने इन्सुली घाटात पुणे-पणजी प्रवास करणार्या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इन्सुली घाटात घडली. सुदैवाने यात गाडीचे नुकसान वगळता प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील शिवशाहीचा चालक निलेश कांबळे हा आपल्या ताब्यातील शिवशाही बस घेवून पणजी ते पुणे असा प्रवास करीत होता. इन्सुली येथील धोकादायक वळणावर आला असता मागून भरधाव वेगाने ओव्हरटेक करणार्या टेम्पाने बसला धडक दिली. यात पुढील भागाचे नुकसान झाले असून काच फुटली आहे. हा प्रकार अचानक झाल्यामुळे चालक कांबळे यांना काहीच कळले नाही. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराला दिली. त्यानंतर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे व सहकार्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबतची माहिती बोधे यांनी दिली. ते म्हणाले, अपघातानंतर संबंधित टेम्पो चालकाने पळ काढला. त्याचा शोध घेण्यात येणार आहे. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पंचनामा सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेले नाही.