You are currently viewing आजचे युग हे मार्केटिंग व मॅनेजमेंटचे : ॲड. संतोष सावंत

आजचे युग हे मार्केटिंग व मॅनेजमेंटचे : ॲड. संतोष सावंत

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात तृतीय वर्षाचा निरोप समारंभ

सावंतवाडी

आजचे युग हे मार्केटिंग व मॅनेजमेंटचे आहे. यात टिकायचे असेल तर जिद्द चिकाटी व परिश्रम अत्यंत आवश्यक आहेत. आजचा विद्यार्थी हा उद्याचे देशाचे भविष्य आहे. व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन आपण आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारचे वळण लावू शकता. गव्हाणकर महाविद्यालयातील विद्यार्थी एक आदर्श म्हणून ओळखला जातो. आपणही त्याच प्रकारे पुढे जायचे आहे. मात्र, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई वडील आणि गुरुजन यांचा आदर आणि मानसन्मान ठेवायला शिका. त्यातूनच तुम्ही भविष्यात देशाचे उत्तम नागरीक बनाल, असे प्रतिपादन कोमसापचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी केले.

सावंतवाडीतील गवाणकर महाविद्यालयात तृतीय वर्षाचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी गेल्या बारा वर्षांपूर्वी या जिल्ह्यात मॅनेजमेंटचे कॉलेज सुरू केले आणि एक शैक्षणिक नवी दिशा सर्वसामान्य गोरगरिब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. भविष्यतही याच विद्यालयाच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासक्रम आणले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबविले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच बेस्ट स्टुडन्ट भावेश पाटील व बेस्ट गर्ल्स दिव्या काकतकर या दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावर्षी चॅम्पियनशिप द्वितीय वर्ष बी एम एस या ग्रुपने पटकावले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गवस म्हणाले की आज पर्यंत ६०० हून अधिक विद्यार्थी बी एम एस सी डिग्री घेऊन बाहेर पडले. आज ते देशात परदेशात विविध ठिकाणी मोठ्या पदावर काम करत आहेत. तुम्हीही मन लावून अभ्यास केल्यास तुम्हालाही यश दूर नाही, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राध्यापक एल पी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. आज स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि या तीव्र स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचे असेल तर सातत्य राखले पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्राध्यापक साईप्रसाद पंडित यांनी केले यावेळी प्राध्यापक आनंद नाईक, अस्मिता गवस व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा