You are currently viewing मनसेची मुळदे कोकण कृषी विद्यापीठात धडक

मनसेची मुळदे कोकण कृषी विद्यापीठात धडक

कुडाळ :

 

कुडाळ येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे केंद्राला आज महाराष्ट्र नवनिर्माण शिष्टमंडळाने धडक दिली. मुळदे गावातील रहिवाशी कामगारांच्या जमिनी कृषी केंद्रासाठी घेण्यात आल्या आहेत परंतु त्या कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही. हे कामगार लाल मस्टर कार्यरत होते. परंतु त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता लाल मस्टर बंद करून रोजंदारी स्वरूपात समाविष्ट करण्यात आले.

मुळदे कृषी केंद्रात काही कामगार 25 ते 30 वर्ष कार्यरत असून त्यांना कोणत्याही प्रकारची कामे करतानाची सुरक्षा यंत्रणे दिली जात नसून कामगारांना काम करताना कोणतीही इजा झाल्यास विद्यापीठाकडून उपचारासाठी कोणतेही वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात नाही. यामुळे असंख्य कामगार हतबल झालेले आहेत.

सदर कामगार यांनी काल मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे येऊन तक्रार केली. त्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत आज मुळदे येथील बाळासाहेब कृषी केंद्र कॉलेजला मनसे शिष्टमंडळाने धडक दिली. यावेळी कॉलेजचे असोसिएट डिन डॉ प्रदीप हळदवणेकर यांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. तसेच याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, म न.वि.से माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, म.न.वि.से कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत, प्रवीण गवस, निलेश देसाई, सिद्धेश माळकर तसेच ग्रामस्थ व कामगार उपस्थित होते.

यानंतर व्यवस्थापक श्री. हळदवणेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू तसेच एक संयुक्तिक बैठक आयोजित करून यावर तोडगा काढू, असे चर्चेदरम्यान ठरले व कामगारांना लागणारे साहित्य आपण संस्थेच्या माध्यमातून पुरवू असे आश्वासन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा