गुंतवणूकदारांचे पैसे न मिळाल्यास मनसे मोर्चा काढणार..
कणकवली
ई-स्टोर इंडिया कंपनीने सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. जिल्ह्यात चारशे कोटींचा व्यवसाय या कंपनीने केला. तर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यास मनसेतर्फे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते परशूराम उपरकर यांनी आज दिली. तसेच फसलेल्या गुंतवणूकदारांनी कणकवलीतील मनसे कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ई स्टाेर कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे निवेदन एजंटांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गुंतवणुकीनंतर दुप्पट रक्कम मिळेल अशी ग्वाही या कंपनीकडून देण्यात आली होती. आता मात्र या कंपनीने कणकवली आणि फोंडाघाट येथील आपली कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. जे गुंतवणूकदार फसले आहेत त्यांनी आपला आयडी नंबर, गुंतवलेली रक्कम, खात्याच्या पासबुकची झेरॉक्स अशी तक्रार घेऊन २० एप्रिल पर्यंत मनसे कार्यालय कणकवली येथे संपर्क साधावा. तक्रारदारांसोबत आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे श्री.उपरकर म्हणाले.