You are currently viewing बांधावरती ज्वार डोलते

बांधावरती ज्वार डोलते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बांधावरती ज्वार डोलते….*

बांधावरती ज्वार डोलते लचकते हो काया
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया…
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया….

नऊवारीत भरजरी नार
मुरकते की बांधावर ज्वार
टंच जवानी की भरदार
बघा पांखरे फिरती भवती बघा हो दाणा टिपाया…
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया…

बांधा बांघाला डोलतो शाळू
नजर ठेवत्यात काळू नि बाळू
लगट त्यांची मी किती हो टाळू
थरथरते हो काया माझी दृष्ट लागते राया…
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया…

साडी चोळीत हिरव्यागार
ठुमकते मी बांधावर नार
कणसे बघा ना ही तुर्रेदार
सोनसळी मी हिरवी पिवळी गिर्रेबाज ही काया…
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया…

खुडा कणिस अलगद राया
दाणा नको हो जावया वाया
ग्वाड लागते छानच खाया
मनात भरते तुमच्या नेहमी आहे तुमची छाया..
मनात तुमच्या मीच आहे मीच आहे ना राया..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ९ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी१/४५

प्रतिक्रिया व्यक्त करा