You are currently viewing माझे विदर्भ महाविद्यालय

माझे विदर्भ महाविद्यालय

*माझे विदर्भ महाविद्यालय* …..

*शतकपूर्ती महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी……*

अमरावती

परवा माझ्या मोबाईल वर मला एक एसएमएस आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा.श्री वसंतराव देशमुख यांनी तो पाठवला होता. ते आमच्या दर्यापूरचे .म्हणजे आमच्याच तालुक्यातले. मला वाटलं की तो स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातला मेसेज असावा म्हणून मी तो पहायला गेलो तर आनंदाचा धक्काच बसला. विदर्भ महाविद्यालयाच्या शतकपूर्ती कार्यक्रमाची ती पत्रिका होती.विदर्भ महाविद्यालयाच्या म्हणजे आताच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या विद्यमान संचालिका डॉ. अंजलीताई देशमुख यांनी ती पाठवली होती आणि तीच पत्रिका आमचे सन्मित्र श्री वसंतराव देशमुख यांनी माझ्याकडे पाठवली होती. विदर्भ महाविद्यालयाचा आणि माझा खूप जुना ऋणानुबंध आहे .मी केवळ या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थीच नाही तर या महाविद्यालयाचा एक अविभाज्य अंग आहे. माझे बालपण याच महाविद्यालयाच्या परिसरात वाढीस लागले .माझे वडील अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये कार्यरत होते आणि आमचे राहणे होते विदर्भ महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या लक्ष्मीनगरमध्ये .विदर्भ महाविद्यालयाच्या स्टेडियमवर अनेक वेळा फुटबॉल मॅचेस हॉकीच्या मॅचेस चालायच्या. आमचा अभ्यास तेव्हा शाळेतच व्हायचा. त्यामुळे शाळा संपली की आम्ही मोकळे असायचो . त्यामुळे त्या मँचेस आम्ही आवर्जून पहायला जात होतो. पुढे मी मराठी भाषेमध्ये एम ए करण्यासाठी विदर्भ महाविद्यालयामध्ये १९७४ या वर्षी प्रवेश घेतला. विदर्भ महाविद्यालयाला मी आयुष्यात विसरू शकत नाही कारण की या महाविद्यालयाने माझे व्यक्तिमत्व अष्टपैलू केले .मी खरं म्हणजे केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये सकाळी नोकरी करून विदर्भ महाविद्यालयामध्ये एम ए करीत होतो. तेव्हा परिस्थिती खूपच गरिबीची होती. बसचे तिकीट पाच पैसे होतं .पण ते पण खिशात नसायचे .श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये नोकरीची वेळ संपल्यानंतर मी पायी विदर्भ महाविद्यालयात जात होतो.माझी ही तारांबळ तेव्हाच्या मराठी विभाग प्रमुख सहृदयी प्रा. श्रीमती मनूताई नातू यांनी ओळखली आणि त्यांनी त्यांच्याकडची एक जुनी लेडीज सायकल माझ्या हवाली केली .वर सायकल दुरुस्त करायला पैसे पण दिले .मी विदर्भ महाविद्यालयात पहिल्या वर्षी मराठी वाङ्मय मंडळाचा उपाध्यक्ष होतो. दुसऱ्या वर्षी मी अध्यक्ष झालो .माझ्या कार्यकाळात मी रेकॉर्ड ब्रेक २४ कार्यक्रम घेतले .१९७४-७५ या वर्षी मी एम ए भाग एक मराठी ला असताना माझा पहिला कवितासंग्रह जीवन ज्योती प्रकाशित झाला. १९७५-७६ या वर्षी मी एम.ए.मराठी द्वितीय वर्षाला असताना माझा झेप नावाचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. महाविद्यालयीन जीवनात दोन कवितासंग्रह निघणारा त्या काळातील मी एकमेव विद्यार्थी असावा.आम्हाला विदर्भ महाविद्यालय आमच्या घरासारखे वाटायचे .भव्य वास्तू १८० एकराचा अवाढव्य परिसर आणि त्याच तोलामोलाची भव्य माणसे. आम्हाला मराठी विभाग प्रमुख मनुताई नातू,प्रा सरपटवार, प्रा. वसंत आबाजी डहाके.प्रा.विजया डबीर प्रा. डॉ. सुशीला पाटील, प्रा. प्रभा गणोरकर ही तज्ञ प्राध्यापक मंडळी होती. आमच्या मराठी विभागाला लागूनच संगीत विभाग होता. जणू तो आमच्या मराठी विभागाला पार्श्व संगीत देत होता. प्रा.दि.व्य. जहागीरदार हे वादविवाद विभागाचे प्रमुख होते .आम्हाला ते नेहमी वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्या म्हणून प्रोत्साहित करीत होते. माझ्या दुसऱ्या कवितासंग्रहाला प्रा.वसंत आबाजी डहाके यांचे मुखपृष्ठ आहे .प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके हे तेव्हा चर्चेत असलेली नावे .दोघांनी आम्हाला मनापासून मराठी शिकविले आणि आम्हीही ते मनापासून ग्रहण केले. पुढे मी मराठीमध्ये नागपूर विद्यापीठांमध्ये पहिला आलो आणि अमरावतीच्या सुप्रसिद्ध श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये मध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. पण विदर्भातील ह्या विदर्भ महाविद्यालयातल्या आठवणी अजूनही मनात कायम घर करून आहेत.विदर्भ महाविद्यालयाचे भव्य सभागृह व तिथे होणारे कार्यक्रम हे आजही आठवतात. मी जरी मराठीमध्ये एम ए करीत होतो तरी कोणताही आणि कोणत्याही विभागाचा कार्यक्रम असला तरी न चुकता मी तो कार्यक्रम ऐकत होतो .इच्छा एकच होती की आपल्या ज्ञानात सतत भर पडत राहावी. मला आठवते विदर्भ महाविद्यालयात के.एम. कुलकर्णी नावाचे प्राध्यापक होते. आताही आहेत. सेवानिवृत्त झालेले आहेत .मी विदर्भ महाविद्यालयात संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहामध्ये डॉ.श्रीराम लागू यांच्या सूर्य पाहिलेला माणूस या नाटकाचे चार लागोपाठ प्रयोग घेतले होते .सभागृहाचे भाडेही भरायला पैसे नव्हते. माझी अडचण कुलकर्णी सरांनी ओळखली आणि स्वतःच्या घरून नाट्यगृहाचे भाडे भरले .बागेतील कवी संमेलन हा आमचा उपक्रम विदर्भ महाविद्यालयामध्ये खूपच गाजला . विदर्भ महाविद्यालयातील विविध शाखेतील व विविध वर्गातील कवींनी एकत्र येऊन विदर्भ महाविद्यालयाच्या बगीच्यामध्ये कवी संमेलने घेणे सुरू केले.त्यामध्ये अशोक थोरात व अशोक रांणा यांनी पुढाकार घेतला. मी या उपक्रमावर तेव्हा लेख लिहून तरुण भारतमध्ये छापून पण आणला होता. माझ्या झेप कविता संग्रहाला प्रा. मधुकर केचे यांनी सोळा पानांची प्रस्तावना लिहिली. त्यामध्ये त्यांनी आवर्जून विदर्भ महाविद्यालयाचा उल्लेख केला होता आणि या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी आग्रह धरला होता. स्वतः मधुकर केचे या महाविद्यालयाचे सातत्याने नऊ वर्षे विद्यार्थी होते .आमचे दोन वर्ष कशी निघून गेली ते आम्हालाच कळले नाही. या दोन वर्षात मी थोडी जास्तच धावपळ केली.नोकरी सांभाळून कॉलेज करीत होतो . मराठी साहित्य मंडळ चालवीत होतो. विदर्भवाणी या वार्षिकांकाची धुरा माझ्याच खांद्यावर होती तरी पण मी ही कसरत यशस्वीपणे पूर्ण केली. सर्वच प्राध्यापकांचा मी आवडता विद्यार्थी होतो. साहजिकच त्यांच्याकडे माझे जाणे येणे होते. इतर विद्यार्थी मात्र बिचकत. त्यातही मराठी विभाग प्रमुख श्रीमती मनूताई नातू यांनी मला सायकल दिल्यामुळे माझा भाव जरा वधारलाही होता. पण कधी त्याचा दुरुपयोग आम्ही केला नाही.या महाविद्यालयाने आमचे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी तपस्वी केले. खरी जडणघडण झाली तीच या महाविद्यालयात आणि त्या काळातील प्राध्यापक ही खऱ्या अर्थाने प्राध्यापक होते .त्यांच्या पुस्तकांचा व्यासंग वाचनाचा व लेखनाचा व्यासंग आमच्याहीमध्येही उतरला तर त्यामध्ये काही नवल नाही आणि मी एम ए होऊन ५५ वर्षाचा कालावधी उलटला आहे. परंतु कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे या न्यायाने आम्ही या महाविद्यालयाकडे पाहतो .परवा आम्ही काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा अमरावतीला आयोजित केला होता . माझे मित्र व आरटीओ अधिकारी श्री ज्ञानदेव मोडक यांनी पुढाकार घेतला व खर्चही केला .झाडून सगळे आले .प्रत्येकाने आपला क्लास वन क्लास टू चा झगा उतरून ठेवला होता .किती आनंद झाला म्हणून सांगू आणि आज सोमवार दि.१० ला तर शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात या शतकपूर्ती महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. या महाविद्यालयाची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे .त्याचबरोबर असंख्य माजी विद्यार्थी देखील हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. या कार्यक्रमात उल्लेखनीय म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम . हा भार महाविद्यालयाने याच महाविद्यालयातील प्रा डॉक्टर सुधीर मोहोड व प्रा. डॉ.श्रीमती महल्ले यांच्यावर महाविद्यालयाने सोपवला आहे .माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेणारे हे कदाचित पहिले महाविद्यालय असावे .विदर्भ महाविद्यालयाने आम्हाला खूप काही दिले आहे .आता आम्ही काहीतरी दिले पाहिजे .ती आमची जबाबदारी आहे. विदर्भ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असंख्य आहेत.साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना या न्यायाने आम्ही सर्व एकत्र आलो तर विदर्भ महाविद्यालयाला चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही. मी व्यक्तिगत माझ्या मिशन आयएएसतर्फे या शतकपूर्ती निमित्त बारा स्पर्धा परीक्षा कार्यक्रमांचे उत्तरदायित्व स्वीकारतो. त्यानिमित्ताने काही आयएएस आयपीएस तज्ञ आमच्या विदर्भ महाविद्यालयात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो .या भागातील विद्यार्थी प्रशासनात बहुसंख्येने गेले पाहिजेत त्यासाठी मी जे व्रत स्वीकारले आहे त्याअंतर्गत मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. प्रत्येकाने देखील आपला खारीचा वाटा उचलला तर हा पर्वत सहज उचलला जाईल आणि माझे माजी विद्यार्थी हे स्वीकारतीलच याची पूर्ण शाश्वती आहे. शतकपूर्ती समारंभासाठी जे जे अथक परिश्रम घेत आहेत त्या सर्वांना मानाचा मुजरा.
==============
*प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे*
माजी विद्यार्थी
विदर्भ महाविद्यालय व संचालक मिशन आयएएस अमरावती महाराष्ट्र 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा