You are currently viewing जन्म,मृत्यू प्रमाणपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा -जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे 

जन्म,मृत्यू प्रमाणपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा -जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे 

जन्म,मृत्यू प्रमाणपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा -जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे 

सिंधुदुर्गनगरी

 केंद्र शासनामार्फत सर्व राज्यांसाठी जन्म व मृत्यू नोंदणी तसेच जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकृत crsorgi.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. जिल्ह्यामध्ये देखील सन २०१६  पासून सदर संकेत स्थळाचा वापर जन्म – मृत्यू नोंदणीसाठी केला जात आहे. जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सर्व नगर परिषद व नगर पंचायत, ग्रामीण भागामध्ये सर्व ग्राम पंचायत  तसेच सर्व शासकीय आरोग्य संस्था या नोंदणी केंद्रांमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र देण्यासाठी सदर संकेतस्थळाचा वापर करण्यात येत आहे. तरी जनतेने बनावट संकेतस्थळापासून सावध राहून अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी  महेश खलिपे यांनी केले आहे.

                नागरीकांनी जन्म अथवा मृत्यू घटना घडताच २१ दिवसांच्या आत त्याची नोंदणी संबंधित शासकीय संस्था, ग्रामीण किंवा शहरी स्वराज्य संस्था या ठिकाणी नोंदणी करून घेऊन त्याच ठिकाणहून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे – असे आवाहन जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हापरिषद सिंधुदुर्ग यांनी केले. इतर कोणत्याही पद्धतीने किंवा संकेतस्थळावरून घेतलेले प्रमाणपत्र हे यापुढे ग्राह्य धरण्यात येणारा नाही. तशा सुचना दि. २४ मार्च २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण व सभेमध्ये देण्यात आल्या आहेत.  सदर सभेमध्ये सर्व नगर पंचायत / नगर परिषद व पंचायत समिती या ठिकाणी जन्म-मृत्यू नोंदणीचे कार्य पाहत असलेल्या विस्तार अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.  जन्म–मृत्यू नोंदणीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

                नागरिकांनी जन्म अथवा मृत्यूची नोंदणी crsorgi.gov.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील नियुक्त निबंधक जन्म-मृत्यू यांचे मार्फतच करून घ्यावी. नोंदणी २१ दिवसांच्या आत करावी. जन्म व मृत्यू प्रमाणपत्राची प्रथम प्रत नागरिकांना मोफत उपलब्ध आहे. काही ठिकाणी जन्म व मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र देणारी संकेतस्थळे सक्रीय असल्याचे आढळले असून केंद्र शासनाकडून अशी  काही बनावट संकेतस्थळे जाहीर करण्यात आली आहेत. अशा संकेतस्थळांपासून नागरिकांनी सावध राहावे.

जन्म नोंदणी – २०२६ पर्यंत मुदतवाढ

जन्म झालेल्या तारखेपासून १५ वर्षाच्या आत नोंदणी करता येते. काही घटनांच्या बाबतीत वरील कालमर्यादा उलटून गेल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी करण्याचे राहून जाता असल्याने केंद्र शासनाने २७ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

बनावट संकेतस्थळे – जागरूक रहा

CRSORGIGOOVI.IN,  BIRTHDEATHONLINE.COM  CRSRGIIN या संकेतस्थळावरून बनावट प्रमाणपत्रे दिली जातात. अशा संकेतस्थळांपासून  सावध राहावे. कोणत्याही खाजगी संस्था अथवा इतर अनोळखी व्यक्तींकडून मोबदला देऊन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढून घेऊ नये. त्याऐवजी योग्य माहितीसाठी जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा