सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
देवगड
आंबा कलम बागेत विद्युत कनेक्शन देण्याकरिता ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना वीज वितरणचे वाडा शाखेचे सहाय्यक अभियंता अमित आप्पासाहेब पाटील (४२) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीज वितरणच्या वाडा सबस्टेशन कार्यालयात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा येथील एका बागायतदाराने स्वत:च्या बागेसह मित्राच्या नजीकच्या बागेत विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी वीज वितरणच्या वाडा सबस्टेशनमध्ये अर्ज केला होता. मात्र, बागेत विद्युत कनेक्शन देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित पाटील याने संबंधित बागायतदाराकडे त्यांच्या बागेतील विद्युत कनेक्शनसाठी २० हजार रुपये व मित्राच्या बागेत विद्युत कनेक्शन देण्यासाठी १० हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार संबंधित बागायतदाराने सिंधुदुर्गच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २८ मार्च रोजी या गोष्टीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी वाडा सबस्टेशन परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित अमित पाटील याला तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, हवालदार श्री. रेवंडकर, श्री. पालकर, श्री. परब, श्री. पेडणेकर, पोलीस नाईक श्री. पोतनीस यांनी केली. संशयित अमित पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देवगड पोलीस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, संशयित अमित पाटील याला लाच घेताना दुसऱ्यांदा रंगेहाथ पकडण्यात आले असून यापूर्वी त्याच्यावर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गगनबावडा येथे कारवाई केली होती.