You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी मत्स्यविभागाच्या बैठकीत मांडल्या विविध समस्या

आ. वैभव नाईक यांनी मत्स्यविभागाच्या बैठकीत मांडल्या विविध समस्या

*ना. सुधीर मुनगंटीवार यांनी समस्या सोडविण्यासाठी दर्शविली सकारात्मकता*

 

मुंबई :

सागरी जिल्ह्यातील आमदारांनी मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत विधानसभा अधिवेशनात विविध प्रश्न मांडल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सागरी जिल्ह्यातील आमदारांची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य विभागाच्या विविध समस्या, पारंपारिक मच्छीमारांच्या समस्या व प्रश्न मांडले. ते प्रश्न सोडविण्यासाठी ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दर्शविली.

आमदार वैभव नाईक म्हणाले, एलईडी मच्छीमारीवर बंदी असूनही एलईडीद्वारे मच्छिमारी केली जाते. ती पूर्णतः बंद झाली पाहिजे.त्यासाठी राज्य सरकारने निश्चित केलेला अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात यावा. अनधिकृत मच्छीमारीवर कारवाईसाठी आवश्यक असलेल्या स्पीड बोट उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत त्या लवकर उपलब्ध करण्यात याव्यात.समुद्रात कारवाई वेळी मत्स्य अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे. मासेमारी संसाधनांवर अर्थसहाय्य या योजनेचा सर्व मच्छिमारांना लाभ मिळण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी हि अट रद्द करावी.मच्छीमारांच्या कर्जांची कर्जमाफी होण्यासाठी एनसीडीसी अंतर्गत ५८७ कोटीच्या कर्जमाफीचा प्रस्ताव करून मच्छीमारांना कर्जमाफी मिळावी. अशा मागण्या आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या. त्यावर ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दर्शविली.

यावेळी मत्सआयुक्त अतुल पाटणे, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम, आमदार महेश बालदी,आमदार श्रीनिवास वनगा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार भारती लव्हेकर,आदींसह इतर विधानसभा सदस्य, मत्स्य विभागाचे सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा