सावंतवाडी
तालुक्यातील तळवडे – खेरवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक श्री. गुणाजी सिताराम सावंत यांचे पुणे येथे आर्मी हॉस्पिटलमध्ये आज ४ एप्रिल २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते.
श्री. सावंत यांनी आपल्या शिक्षकी पेशाबरोबरच शासनाच्या पोस्टाची अल्पबचत योजना, १००% साक्षरता अभियान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यात उल्लेखनीय योगदान दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. कोकणातील शंकासुर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. अनेक विषयांवर बोलण्यात ते तरबेज होते. आपल्या शालेय सेवेत शाळांच्या भौतिक सुख-सुविधांसाठी त्यांनी लोकवर्गणीतून अनेक उपक्रम राबवले. अध्यात्मावर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सुमारे ३८ वर्षे सेवा बजावली. लहानपणीच आईचे छत्र हरपल्यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. मात्र मामाकडे राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या शैक्षणिक सेवेबद्दल त्यांना शासनाचा जिल्हा परिषद व राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुलगे, सुना, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मॅनेजर सुनील सावंत व सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांचे ते वडील होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार ५ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता तळवडे येथे होणार आहे.