जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आधार, पॅन लिंकसाठी सुरू असलेली वसुली थांबविण्याचा इशारा…
सिंधुदुर्गनगरी
आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सुरू असलेल्या जाचक दंड वसूली धोरणाचा निषेध करण्यासाठी मनसेने जिल्हाधिकारी कार्यासमोर सामूहिक भिकमागो आंदोलन केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. आयकर खात्याने नव्याने सुरू केलेले जाचक वसुली योग्य नाही. त्यामुळे ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कुणाल किनळेकर,राजेश टंगसाळी,सुनील गवस, सनी बागकर,अमोल जंगले, दीपक गावडे,बाबल गावडे,संतोष भैरवकर,दया मेस्त्री,गुरु मर्गज,संदेश शेट्ये,सत्यविजय कवीटकर,आपा मांजरेकर यासंह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनसे शिष्टमंडळाने जमवलेली भिक्षेची रक्कम निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत दंड वसुली तात्काळ थांबवण्यात यावी व आधार पॅन लिंक उपक्रम विनाशुल्क ग्रामस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्याबाबत धोरण निश्चित करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.