वेंगुर्ले
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे ६ एप्रिल भाजपा स्थापना दिवस ते १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा आठवडा देशभरात सामाजिक न्याय सप्ताह म्हणून साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा सप्ताह प्रत्येक मंडलात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा वेंगुर्ले कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, बाळू प्रभू आदी उपस्थित होते.
चंद्रकांत जाधव पुढे म्हणाले की, ६ एप्रिलला भाजपाच्या सर्व जिल्हा, मंडल आणि लोकप्रतिनिधी संपर्क कार्यालय प्रथम ध्वजारोहण, सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावणार, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान तसेच भाजपाकडून सुरू असलेल्या विकासात्मक कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम यावेळी केले जाणार आहे.
तर १४ एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन, विविध सामाजिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या नऊ वर्षात अनुसूचित जातीतील लोकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.