*लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा ५० धावांनी केला पराभव*
*मार्क वुडने घेतल्या पाच विकेट*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या घरच्या मैदानावर एकना स्टेडियमवर प्रथम खेळताना शानदार विजय मिळवला. त्यांनी शनिवारी (१ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५० धावांनी मोठा विजय मिळवला. लखनौने दिल्लीचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला. गेल्या मोसमात साखळीच्या दोन्ही लढतींत त्याचा पराभव केला होता. दुसरीकडे, नियमित कर्णधार आणि स्टार खेळाडू ऋषभ पंतशिवाय दिल्लीची सुरुवात खराब झाली. गोलंदाजांची खराब कामगिरी आणि मधल्या फळीमुळे त्यांचा पराभव झाला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४३ धावाच करू शकला. लखनौचा संघ आता ३ एप्रिलला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी ४ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर वगळता एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. वॉर्नरने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने ४८ चेंडूत ५६ धावा केल्या. यादरम्यान सात चौकार मारले. रिले रुसोने २० चेंडूत ३० धावा, अक्षर पटेलने ११ चेंडूत १६ धावा, पृथ्वी शॉने ९ चेंडूत १२ धावा केल्या. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज मिचेल मार्श या सामन्यात खातेही उघडू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर त्याला मार्क वुडने त्रिफळाचीत केले. सर्फराज खान, अमन हकीम खान आणि चेतन साकारिया प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. रोव्हमन पॉवेलला केवळ एक धाव करता आली. कुलदीप यादव सहा आणि मुकेश कुमार खाते न उघडता नाबाद राहिले.
लखनौ सुपर जायंट्ससाठी मार्क वुडने टिच्चून गोलंदाजी केली. त्याने चार षटकात १४ धावा देत पाच बळी घेतले. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला लागोपाठ दोन चेंडूत बाद करून वुडने खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्याने सर्फराज खान, अक्षर पटेल आणि चेतन साकारिया यांना बाद केले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, लखनौकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने ३८ चेंडूत सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. निकोलस पूरनने २१ चेंडूत झटपट ३६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आयुष बदोनीने शेवटच्या षटकात सात चेंडूत १८ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले.
दीपक हुडा १७, मार्कस स्टोइनिस १२ आणि केएल राहुल आठ धावा करून बाद झाले. कृणाल पंड्या १३ चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि कृष्णप्पा गौतमने एका चेंडूवर सहा धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.