You are currently viewing देश विघातक कृत्यासाठी आमदारांना २४ तासाच्या आत अटक करावी – अतुल भातखळकर

देश विघातक कृत्यासाठी आमदारांना २४ तासाच्या आत अटक करावी – अतुल भातखळकर

मुंबई:

 

बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व बांगलादेशी घुसखोरांना मिळवून देणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी त्या टोळीकडून महाराष्ट्रातील एमआयएम व काँग्रेसच्या एका आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असून देशविघातक कृत्यासाठी या आमदारांना २४ तासांच्या आत अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यसरकार कडे केली आहे.

 

मुंबईत अंधेरी येथील साकीनाका एरियात पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून जी माहिती तपासात पुढे आली आहे ती गंभीर आहे. या टोळीने एमआयएमचे मालेगावातील आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल आणि काँग्रेसचे आमदार शेख आसिफ शेख रशीद तसेच अन्य पाच आमदारांच्या लेटरहेडचा वापर करून मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह देशातील विविध शहरांमध्ये बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचे काम केले आहे. या टोळीकडे या दोन आमदारांची ७ कोरी लेटरहेडसुद्धा मिळाली आहेत.

 

पोलिसांना मिळालेल्या तपासातून जी माहिती पुढे येत आहे ते पाहता हा प्रकार अत्यंत घातक आणि धोकादायक आहे.   बांगलादेशीय घुसखोरांना भारतात आधार देण्यासाठी हातभार लावणाऱ्या आमदारांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली. आमदारांचा हा खेळ घातक असून या देश विघातक षडयंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे, असे नमूद करत लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय?, असा सवाल भातखळकर यांनी विचारला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याचा तपास ‘राष्ट्रीय तपास संस्थेकडे’ ( एनआयए ) द्यावा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली.

 

वंदे मातरमला विरोध, कलम ३७० हटवण्यास विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एनआरसीला विरोध, असा सगळीकडे विरोध करणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी व त्यांच्या पक्षाने आपले मतदार वाढवण्यासाठी आता बांगलादेशींना बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व देण्याची मोहीम हाती घेतली आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल आणि काँग्रेसचे आमदार शेख आसिफ शेख रशीद यांनी हे आरोप फेटाळले आहेत. कागदपत्रांची खातरजमा करूनच आमच्या कार्यालयातून शिफारसपत्रे दिली जातात. त्यामुळे अशी लेटरहेड सापडली असल्यास त्याची कसून चौकशी केली जावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली. मालेगावात बोगस आधारकार्ड आणि बोगस मतदार ओळखपत्रं बनवणारी टोळी सक्रिय असल्याची तक्रार मी वेळोवेळी केली आहे, असे शेख आसिफ शेख रशीद यांनी सांगितले.

 

दोन बांगलादेशींना अंधेरी साकीनाका येथून पोलिसांनी अटक केली असून बोगस कागदपत्रांच्या आधारे ते मुंबईत राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात मालेगाव येथून एका एजंटला अटक केली आहे. या एजंटच्या घरातून पोलिसांनी १५५ आधार कार्ड, ३४ पासपोर्ट, २८ पॅनकार्ड, ८ रेशनकार्ड, १८७ बँक व पोस्टाची पासबुक, १९ रबर स्टॅम्प, २९ शाळा सोडल्याचे दाखले जप्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा