मोठ मोठी झाडे पडली भक्ष्यस्थानी; अग्निशामक बंबमुळे आग नियंत्रणात
सावंतवाडी भटवाडी येथे भर वस्ती लगत असलेल्या जंगलात आज अग्नी तांडव पेटला. या आगीत भल्या मोठ्या तीन ते चार उभ्या झाडांनीही पेट घेतला. मात्र तात्काळ त्या ठिकाणी पालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही घटना आज सायंकाळी उशिराच्या सुमारास घडली. दरम्यान झाडे जळून धोकादायक बनल्यामुळे परिसरातील घरांवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने नजीकच्या घरातील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली. तर घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर हेही त्याठिकाणी तात्काळ दाखल झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित परिसरात सायंकाळच्या सुमारास किरकोळ आग लागलेली नागरिकांनी पाहिली होती. मात्र उशिरा आगीने रौद्ररूप धारण केले. यात भलीमोठी तीन ते चार झाडे उभीच्या उभी पेटली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर तात्काळ पालिकेचा अग्निशमन बंब बोलवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत संबंधित झाडे जाळल्यामुळे धोकादायक बनली आहे. ती नदीच्या परिसरात असलेल्या घरावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने परिसरातील घरातील नागरिकांना अन्यत्र हलविण्यासाठी सामाजिक बांधिलकीने प्रयत्न केले.