पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांच्याकडे मागणी; सदस्यांकडून निवेदन सादर…
वेंगुर्ले
कोकण किनारपट्टीवर कार्यरत असणाऱ्या सागर रक्षक दल सदस्यांना मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत नुकत्याच कोकण दौऱ्यावर आलेल्या श्री. पवार यांची सागर रक्षक दल सदस्यांनी भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सागर रक्षक दलाचे सदस्य योगेश तांडेल, जगन्नाथ खवणेकर, सुहास तोरस्कर, संतोष साळगावकर, वासुदेव जुवलेकर, भरत पेडणेकर, संभाजी येरागी, मधुसूदन सांगवेकर, सुरज अमरे, सूर्यकांत गावकर, शिवप्रसाद रेडकर, गजानन कुबल, दिलीप कुडव, अशोक चोपडेकर यांच्यासह सर्व सागर रक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते.
कोकण किनारपट्टीवर सागर रक्षक दल सदस्य गेल्या ३० वर्षापासून सागर रक्षक दलाचे सदस्य कार्यरत आहोत. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्याच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये सागर रक्षक दल सदस्यांची नेमणूक करून किनारपट्टीवरील दहशतवादी हालचालींवर लक्ष देण्याकरिता एक सुरक्षा कवच निर्माण करण्यात आले. महाराष्ट्राला लाभलेल्या संपूर्ण किनारपट्टीवरील गावांमध्ये गेल्या 30 वर्षापासून निस्वार्थीपणे सागर रक्षक दलाचे सदस्य म्हणून कार्यरत राहणाऱ्या सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी विविध मार्गाने व विविध प्रकारे किनारपट्टीवरील दहशतवाद विरोधी सुरक्षितेबरोबरच किनारपट्टीवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांच्या वर्दळीमुळे काही ठिकाणी उद्भवणाऱ्या प्राणघातक घटनांच्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा न बाळगता रात्रंदिवस कार्यरत असतात. आपल्या देशामध्ये घडणाऱ्या बहुतांश दहशतवादी कारवाया घडून आणण्याकरिता देशाच्या किनारपट्टी भागाचा दहशतवादी वापर करताना दिसून येतात या दहशतवादी कारवायांना आळा घालून देशाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर गृह खात्याने सागर रक्षक दल ही संकल्पना अमलात आणून गेल्या ३० वर्षापासून या सागर रक्षक दल सदस्यांच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. सागरी पोलीस ठाण्यांतर्गत नेमल्या जाणाऱ्या गावातील सागर रक्षक दल सदस्यांना वेळोवेळी सतर्क राहून पोलिसांच्या संपर्कात राहावे लागते तसेच दरमहा सागर रक्षक दल सदस्यांची पोलीस ठाण्यामध्ये बैठक आयोजित केली जाते अशावेळी ४० ते ५० किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या सागर रक्षक दल सदस्यांना आर्थिक फटका सहन करून पोलीस ठाणे गाठावे लागते सागर रक्षक दल सदस्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन आतापर्यंत दिले गेलेले नाही.
त्यामुळे गेली तीस वर्ष कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता देशसेवेचे व्रत घेऊन किनारपट्टी भागात वावरणाऱ्या सागर रक्षक दल सदस्यांना सद्यस्थितीतील वाढती महागाई लक्षात घेऊन मानधन सुरू करण्यात यावे तरी वरिष्ठ पातळीवर याबाबत योग्य ती कार्यवाही होऊन आम्हा सागर रक्षक दल सदस्यांना लवकरात लवकर मानधन सुरु करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.