ए आई मला पावसात जाऊ दे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांनी कवयित्री कै.वंदना विटणकर यांच्या बालगीताचे केलेले रसग्रहण*

ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे..

मेघ कसे बघ गडगड करिती
विजा नभातून मला खुणविती
त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूक दादा हाक मारतो
पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे .

धारे खाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे

ए आई मला पावसात जाऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे…

हे बालगीत सुप्रसिद्ध कवियत्री कै. वंदना विटणकर यांचे आहे . वंदना विटणकर यांनी प्रेम गीते, भक्ती गीते, कोळी गीते, बालगीते लिहिली. जवळजवळ ७०० गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बालकथा, बालनाट्ये आणि बालगीते खूप गाजली आहेत. त्यापैकीच “ए ! आई मला पावसात जाऊ दे..” हे आठवणीतले बालगीत.

या बालगीतात ध्रुव पद आणि नंतर तीन तीन ओळीचे चरण आहेत. प्रत्येक चरणात, पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे. जसे की करिती— खुणाविती, नाचतो —मारतो, राहुनी— पाणी. आणि प्रत्येक चरणातील शेवटच्या ओळीतील, शेवटचा शब्द ध्रुवपदातल्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधते,.
मला चिंब चिंब होऊ दे— या ध्रुवपदातल्या दुसऱ्या ओळीशी, खूप खूप नाचू दे, पाठलाग करू दे ,वाटेल ते होऊ दे, या प्रत्येक चरणातल्या शेवटच्या पंक्ती छान यमक जुळवतात. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो.

हे संपूर्ण गीत वाचताना, ऐकताना आईपाशी हट्ट करणारा एक अवखळ लहान मुलगा दिसतो. आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची आई सुद्धा अदृष्यपणे नजरेसमोर येते. पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय! मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत, आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी मला अंगणात बोलवत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या भावनांसकट या शब्दांतून अक्षरशः दृश्यमान झाली आहे.

साचलेल्या पाण्यात बदके पोहतात, बेडूक डराव डराव करतात ,त्या पाण्यामधून त्यांचा पाठलाग या बालकाला करायचा आहे.हा त्याचा बाल्यानंद आहे. आणि तो त्याने का उपभोगू नये याचे काही कारणच नाही. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळ वंदनाताईंच्या या सहज, साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे. स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो.

“पावसाच्या धारात मी उभा राहीन, पायांनी पाणी उडवेन, ताप, खोकला, शिंका, सर्दी काहीही होऊ दे पण आई मला पावसात जाऊ दे…”.हा बालहट्ट अगदी लडीवाळपणे या गीतातून समोर येतो.यातला खेळकरपणा,आई परवानगी देईल की नाही याची शंका,शंकेतून डोकावणारा रुसवा सारे काही आपण शब्दांमधून पाहतो.अनुभवतो.आठवणीतही हरवतो
या गीतात सुंदर बालसुलभ भावरंग आहेत.
खरोखरच ही कविता, हे गीत वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आपले वयच विसरायला लावते. आपण आपल्या बालपणात जातो. या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा, बदके, बेडूक, तो मुलगा सारे एक दृश्य रूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात. एकअवखळ बाल्य घेउन येणारे,आनंददायी रसातले हे रसाळ गीत आहे.

वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालसाहित्याला दिलेली ही अनमोल देणगीच आहे. सदैव आठवणीत राहणारी सदाबहार.

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा