सावंतवाडी
माडखोल टेंबवाडी येथील कृष्णा चंद्रकांत पालव (२६) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा गोव्यात कामाला होता. तेथून तो मंगळवारी आपल्या घरी परतला होता. बुधवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्याचे वडील गुरे चारण्यासाठी जंगलात गेले तर आई घरकाम करत होती. याचवेळी त्याने आपल्या बेडरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
बराच वेळ झाला तरी मुलाने बेडरूमचा दरवाजा न उघडल्यामुळे शिवाय हाक मारल्यानंतर त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने अखेर आईने खोलीत जाऊन पाहणी केली मुलगा कृष्णा हा गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकारानंतर आईने हंबरडा फोडला. तिच्या रडण्याच्या आवाजाने शेजारच्या लोक धावून आले. त्यांनी त्याला गळफास लावलेल्या ठिकाणावरून खाली उतरले व तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याबाबत वडील चंद्रकांत पालव यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.