आचरा ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी यांना पुत्रशोक
मालवण
आचरा येथील पलाश निलेश सरजोशी या बारा वर्षीय बालकाचे मंगळवारी एका खासगी रुग्णालयात उचार सुरू असताना अकाली निधन झाले. पलाश याचे निधन झाल्याची वार्ता आचरा दशक्रोशीत पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कु. पलाश हा आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानचे ग्रामोपाध्याय व इंग्लिश मिडीयम स्कुल कमिटी चेअरमन निलेश सरजोशी यांचा मुलगा आहे.
मालवण तालुक्यातील आचरा येथील निलेश सरजोशी यांचा मुलगा पलाश हा तीन दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.पलाश हा आचरे येथील नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. त्याला बुद्धिबळाची आवड होती. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये पलाश हा हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होता. त्याच्या अकाली निधनाने सरजोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आचरा गावातही शोककळा पसरली आहे. आचरा व्यापाऱ्यांनी आपली दुकानें बंद करत आचरा बाजारपेठ बंद ठेवली होती.