जिल्हा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव…
सिंधुदुर्गनगरी
तुम्ही जिल्ह्यातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात. हे तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून सिद्ध केले आहे. यापुढेही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हा, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख,उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, तुम्ही जिल्ह्यातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात हे सिद्ध केले आहे. यापुढेही अभ्यासात सातत्य ठेवून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हा. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सर्वांगीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी नियमित वाचन केले पाहिजे. या वयातच स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेऊन भविष्यात उच्च पदावर जाण्याची जिद्द आणि चिकाटी आत्मसात करावी. असे प्रतिपादन यावेळी केले.
आजच्या या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या पृथ्वीराज पांडुरंग मोघर्डेकर, मयंक महेश चव्हाण, यशश्री गुरुनाथ ताम्हणकर, जान्हवी विश्वास पाटील, संबोध निलेश तांबे, आदित्य सुभाष कांबळे, वेदांत राकेश चव्हाण, शंभू गणपत पांढरे, श्रेयस अशोक गरकळ, यांच्यासह इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या स्नेहल केशव पाटील, समृद्धी कृष्णा गवस, देवदत्त धनंजय गावडे, महती रवींद्र बुरुड, सम्राट बाबुराव राजे, कैवल्य सागर मिसाळ, श्रेया संदीप शेळके या विद्यार्थ्याना आज सन्मानित करण्यात आले.