खारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडले…
कणकवली
शहरातील कोंडवाडी येथील बंद घराचा कडीकोयंडा, कपाट तोडून आतील रोख रक्कम अज्ञातांनी चोरून नेली. सोमवारी रात्री ही घटना घडल्याची शक्यता आहे. याबाबतची तक्रार घरमालक वसंत गोविंद चाफे (वय ७०) यांनी पोिलसांत दिली आहे.
मूळचे बांदिवडे ता. राजापूर जि. रत्नागिरी या गावचे रहिवासी असलेले व सध्या खारेपाटण कोंडवाडी येथे स्वतः जागा घेऊन घर बांधलेले वसंत गोविंद चाफे हे गेली ८ ते १० वर्षे खारेपाटण कोंडवाडी येथे राहतात. तसेच मुंबई गोवंडी येथे देखील ते आपल्या कुटुंबासह राहत आहेत. अधून मधून आपल्या खारेपाटण येथील गावच्या घराकडे ते येत असतात.
आज मंगळवारी २८ रोजी मुंबईवरून ते गावी खारेपाटणला सकाळी सात वाजता आले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा कडीकोयंडा त्यांना ताेडलेला दिसला. तर आत प्रवेश केला असता घरातील कपड्यांचे कपाट आणि त्यामधील लॉकर तोडून कागदपत्रांसह कपडे फेकून दिलेले आढळले. कपाटातील एक हजार रुपयांची सुट्टी रक्कम देखील अज्ञात चोरट्याने चोरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच आहेराची पाकिटे फाडून त्यातील देखील रक्कम चोरट्यांनी नेली असल्याचे आढळून आले.
सदर घटना लक्षात येताच वसंत चाफे यांनी तातडीने खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना आपले घर अज्ञात व्यक्तीने फोडले असल्याची माहिती दिली. तसेच श्री. चाफे यांनी खारेपाटण पोलीस स्टेशनला देखील आपले बंद घर फोडून घरात चोरी झाली असल्याबाबत लेखी तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व पराग मोहिते करत आहेत.