You are currently viewing मोकाट गुरे प्रश्नी कमलाकांत खोत यांचे उपोषण स्थगित

मोकाट गुरे प्रश्नी कमलाकांत खोत यांचे उपोषण स्थगित

मालवण

मालवण शहरातील मोकाट गुरांच्या समस्येबाबत धुरीवाडा खोतमठ येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकांत खोत व इतर नागरिकांनी सोमवारी मालवण नगरपरिषद कार्यालया समोर छेडलेले आमरण उपोषण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

धुरीवाडा खोत मठ परिसरासह शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला असूण यामुळे नागरिक व वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मोकाट गुरे प्रश्न गेली अनेक वर्षे लढा देणारे ज्येष्ठ नागरिक कमलाकांत खोत यांनी मालवण नगरपालिकेकडे लेखी तक्रार करूनही संबंधित गुरे मालकांवर कारवाई झाली नाही. त्यामुळेच खोत यांनी दिलेल्या पूर्व ईशाऱ्यानुसार कालपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. त्यांना इतर काही नागरिकांचीही साथ लाभली. तसेच या उपोषणाला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर यांसह माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पाठींबा दर्शवला होता.

काल सायंकाळी उशिरा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी खोत यांची भेट घेऊन मोकाट गुरांच्या समस्येबाबत सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याने कमलाकांत खोत यांनी उपोषण स्थगित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा