कणकवली
गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणारी सातत्याने दर वाढ या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. उद्या (ता.२८) कणकवली शहरातील पटवर्धन चौकात सकाळी साडे दहा वाजता आंदोलन सुरू होईल. यात महागाई वाढविणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करून धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा महिला संघटक मधुरा पालव यांनी आज दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले की, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पुढील काळात तर गरिबांना मिळणारे रेशन देखील सरकार बंद करण्याचा विचारात आहे. याचा निषेध करण्यासाठी ‘ चाय पे चर्चा’ आणि ‘चुलीवरची भाकरी’ असे लक्षवेधी आंदोलन कणकवलीत केले जाणार आहे. या आंदोलनावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, आमदार वैभवी नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, लोकसभा संघटक नेहा माने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी युवा सेना अधिकारी सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कणकवली तालुका संघटक वैदेही गुडेकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, समन्वयक सचिन सावंत, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उमेश वाळके तसेच कणकवली तालुका आणि शहरातील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी सदर आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मधुरा पालव यांनी दिली.