बांदा
बांदालगत पाडलोस-भाकरवाडी परिसरात रेल्वे ट्रॅकवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर युवकाचा घातपात की आत्महत्या याबाबतही साशंकता आहे. अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बांदा पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याच्या खिशात मडगाव रेल्वे स्टेशन पर्यंतचे तिकीट सापडले. तसेच एक डायरी आढळून आली. मात्र त्यात पुरावा सदृश्य कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही.
दरम्यान, मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस येताच बांदा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्यासाठी रुग्णवाहिका चालक तथा इन्सुलीचे युवा कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांच्यासह मध्यरात्री १०८ रुग्णवाहिकेच्या डॉ. अनघा बांद्रे, कर्मचारी दादा गवस, पोलीस हेड काँस्टेबल संजय हुंबे यांनी घटनास्थळी भेट दिली.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. सदर युवकाच्या डोक्याला, छातीला जबर दुखापत झाली असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.