*यशवंतराव चव्हाण सेंटर येथे साजरा झाला “पिढ्यांतला स्नेहबंध मेळा”*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढी-पिढीतील स्नेहबंध मेळा” (इंटरजनरेशनल बाँडिंग मेळा) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून चव्हाण सेंटरच्यावतीने युवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात.
युवांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी युवा पुरस्कार तसेच युवांचे कौशल्य वाढीस लागावे, म्हणून युथ एक्सचेंज सारखे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा’, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कायदा-२००७ ची जनजागृतीसाठी वेळोवेळी शिबीरं आयोजित करण्यात येतात.
आजच्या काळात पिढी पिढीतील स्नेह संपत चालला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्नेहबंध नाहीये, असे म्हणायला काही हरकत नाही. पण समाजातील काही कुटुंबामध्ये हा स्नेहबंध जोपासला जात आहे.
आपल्या समाजात एकत्र कुटुंबपद्धतीमुळे एकमेकांत सुसंवाद होता, आत्मीयता होती. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या पिढ्या एकमेकांपासून दुरावत चालल्या आहेत, असे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. हा पिढ्यांमधला संवाद हरवू नये, या जाणिवेतून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढी-पिढीतील स्नेहबंध मेळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर (माजी महापौर, मुंबई), यशवंतराव चव्हाण सेंटरचे पदाधिकारी मा. हेमंत टकले – कोषाध्यक्ष, मा. दिप्ती नाखले – मुख्य कार्यकारी अधिकारी, दत्ता बाळसराफ – कार्यक्रम संयोजक, दिपिका शेरखाने –विभाग प्रमुख- आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग, संतोष मेकाले – विभाग प्रमुख, युवा विभाग, मा. अरुण रोडे – फेसकोम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, अण्णासाहेब टेकाळे, शरद डिचोलकर, मा. औंधे आदी मान्यवर उपस्थित होते.
“जुन्या अनुभवातून नव्या गरजा नवं तंत्रज्ञान यांचा मिलाफ करून अधिक चांगल्या दिशेने वाटचाल करण्याचा एक शुभारंभ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हावा आणि मला असं वाटतं विठू माऊलीचा खरा गजर तोच असेल.” असे उद्गार दत्ता बाळ सराफ या़नी काढले.
“एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. माझ्या दृष्टीने ज्या दोन पिढ्यांमध्ये दुवा म्हणून आपल्याला काम करायला लागतं आणि दुवा म्हणून काम करणाऱ्या संस्था असतात, त्या संस्थांपैकी एक म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अशा ज्या संस्था आहे त्यांनी एकत्र येऊन जर काम करायचं ठरवलं तर कदाचित मी १००% म्हणत नाही पण बऱ्यापैकी आपल्याला जीवन जगताना एक आधार कुणीतरी आहे याचा दिलासा मिळत राहतो हा दिलासा देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करतोय तुम्ही सगळेजण त्याच्यात सहभागी झालात त्यामुळे हा एक खूप चांगला प्रकल्प होत आहे. चव्हाण सेंटर अनेक उपक्रमांमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आलं आहे आणि त्यामधून आपल्याला अधिकाधिक लोक जोडता येत आहेत.” असे उद्गार अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी काढले.
“या चव्हाण सेंटरचे आम्ही मालक नाही आणि आम्ही विश्वस्त आहोत. या सगळ्या कार्यक्रमांचे आम्ही विश्वस्त आहोत. ही वास्तू जितकी आमची तितकी तुमची पण आहे. ती तुमची वाटावी आणि तुम्हाला केव्हाही इथे यायला आनंद व्हावा यासाठी तुम्हालाही आमंत्रण दिले. मी गेले काही दिवस गुलजारजींच पुस्तक वाचत होतो. त्यात त्यांच्या वडिलांची आठवण आहे. त्यांच्या आईची आठवण आहे. आईची आठवण तर इतकी सुरेखा आहे की, मी आईच्या जवळ जायचो आणि आई मला बोट धरून चालायला शिकवायची आता वेळ अशी की माझं बोट धरून मी तिला चालायला शिकवतो. हे जे बाँडिंग असतं ना ते फार महत्त्वाचं असतं हा इमोशनल कंटेंट हा आपल्याला नेहमी द्यायला लागतो. नाहीतर काय आपण सगळेजण त्याप्रमाणे आपला आयुष्य चाकोरी बद्दल असतं कोणी नोकरी करत कोणी व्यवसाय करतात कोणी व्यवसायातून निवृत्त होतो पण तो जो अनुभवाचा एक साठा ऐवज आपल्याजवळ साठलेला असतो तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण हा विचार करतो की आयुष्यात केव्हातरी संध्याकाळ येणार, तुम्ही सुद्धा त्या वयाच्या टप्प्यावर पोहोचणार त्यावेळेला तुम्हालाही काही व्याधी असतील तुम्हालाही काही उपचाराची गरज असेल. उपचार तर सगळे करतात. तुम्ही सुद्धा आता सगळेजण इतके स्मार्ट झालेला आहात की गुगल वरून तुम्हाला तुमचा आजार कळतो, तुमची औषधं तुम्हांला घरपोच मिळू शकतील, पण औषध घेताना जर ठसका लागला तर पाठीवरून हात फिरवायला कोणीतरी हवं असतं, तेव्हा तो हात होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आयुष्यात ज्यावेळेला आपण पुढे पुढे जात असताना म्हणत असतो की केव्हा तरी संपणार आहे पण अजून शिल्लक आहे अजून मला त्याच्यापुढे जाता येईल आणि कदाचित मी त्याच्यापुढेही जाईल आणि मग कदाचित आज मी तुमच्याच बरोबर नसेल पण तुमच्या आठवणीत तरी कुठेतरी राहील या जनरेशनच्या आठवणीत मला कुठेतरी जागा असेल आणि मग आकाशातून बघताना मी म्हणेन अरे तुला आठवतं ना मी तुझ्याबरोबर असताना आपण बरोबरीने शाळेत गेलो होतो तुझ्या कॉलेजमध्ये गेलो होतो तुझ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुला वाटलं की आता तुझ्या मित्रांची ओळख कशी करून द्यायची तेवढ्यात तुझाच एक मित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला आजोबा तुम्ही किती छान दिसताय या वयात कोणी तुम्ही छान दिसताय असं म्हंटलं तरी किती छान वाटतं. हा असा कार्यक्रम वर्षातून एकदा नाही महिन्यातून एकदा सुद्धा व्हायला हरकत नाही आणि केवळ चव्हाण सेंटरमध्येच नाही तुम्ही बोलवा आम्ही सगळे तुमच्याकडे येऊ. आपण सगळेजण मिळून एक काहीतरी चांगलं सुंदर जग निर्माण करूया एवढीच शुभेच्छा. आपण सगळेजण आलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो असेच येत राहा साथ देत रहा आणि आयुष्याचा आनंद एकमेकांमध्ये वाटत रहा.” असे भावोत्कट मनोगत हेमंत टकले यांनी मांडले.
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक क्षेत्रात उत्तम योगदान देणाऱ्या सहा ज्येष्ठ नागरिकांना डॉ. विनोदिनी प्रधान, श्रीम. मनीषा कोटक, डॉ. रेखा भातखंडे, डॉ. अविनाश फाटक, डॉ. रमेश पोतदार, डॉ. जी. जी. पारेख या नागरिकांचा स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करून सत्कार करण्यात आला. “स्वामी विरंगुळा केंद्र” परळ येथील ज्येष्ठ नागरिकांनी मराठी-हिंदी गाण्यांचा नजराणा सादर केला. अजय पानवलकर या दृष्टी बाधित मुलाने कर्णमधुर बासरी वादन करून सभागृहाला अगदी मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ नागरिक व युवांनी मिळून फॅशन वॉक / अॅड मॅड अशा विविध स्पर्धा व सादरीकरण केले. यातील विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.