सिंधुदुर्ग :
मुंबई विद्यापीठ, उपपरिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाच्या वतीने जागतिक समाजकार्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी इंटरनेशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स या संस्थेकडून वेगवेगळ्या थीम ठरविल्या जातात. या वर्षाच्या समाजकार्य दिनाची थीम “रेस्पेक्टिंग डायवर्सिटी थ्रू जॉईंट सोशल ॲक्शन” ही होती. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. शेखर सामंत, संपादक तरुण भारत रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्ती हे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून लाभले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी समाजकार्य विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थनेचे गायन केले. त्यानंतर समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भारतातील महिला समाजसुधारकांच्या सुंदर भित्तीचित्रांचे अनावरण सौ. कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूनम गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी जागतिक समाजकार्य दिवस का साजरा केला जातो याविषयी माहिती देण्याबरोबरच सामाजिक बदलासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदन किती महत्त्वाचे असते हे अधोरेखित केले. समाजातील सर्व स्तरवरील समाजिक जीवनव्यवहार काय असतो, कसा असतो याचा तौलनिक अभ्यास सामाजिक कार्यकर्ते करत असतात. त्यासाठी ते अहोरात्र काम करत असतात म्हणून त्यांचा आदरही राखला गेला पाहिजे यासाठी आजच्या दिवसाचे वेगळे वैशिष्ट्य आहे, हे आपण समजावून घेतले पाहाजे, असेही प्रा. पूनम गायकवाड यांनी सांगितले. प्रा. माया रहाटे आणि प्रा. पूनम गायकवाड यांनी सौ. कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ आणि रोपटे देऊन सन्मान केला, तर मान्यवरांची ओळख मयुरी परब हिने करून दिली. यादरम्यान सौ सुषमा कुलकर्णी यांची मुलाखत प्रा. माया रहाटे यांनी घेतली. यामध्ये त्यांनी बालपणापासून ते आतापर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडून सांगितला. समाज कार्यकर्त्यांनी मानधनापेक्षा समाधानाला जास्त महत्त्व द्यावे असेही त्या म्हणाल्या. व्यावसायिक समाजकार्याचे धडे गिरवताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच स्वतःच्या क्षमता व कौशल्य विकासावर भर देणे तितकेच गरजेचे आहे, असा सल्लाही कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांचे एक सत्र झाले. त्यानंतर सुकन्या ओळकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमास संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. वरदा आरड्ये या विद्यार्थिनींनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.जागतिक समाजकार्य दिनाच्या कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात श्री. शेखर सामंत, संपादक, तरुण भारत रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्ती यांची मुलाखत प्रा. अमर निर्मळे यांनी घेतली. सर्वप्रथम श्री सामंत यांनी समाजकार्य या विषयाशी निगडित भीती चित्रांचे अनावरण केले. श्री. सामंत यांचा परिचय राजेश भालिंगे या विद्यार्थ्याने करून दिला. मुलाखतीत शेखर सामंत यांनी आपला अनुभव कथन केला. आजवर अनेक पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “मला मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा माझ्या लेखणीमुळे एखाद्यास मदत होत असेल, त्याच्या जीवनात आनंद निर्माण होत असेल तर त्यातच मला समाधान आहे आणि मी त्यालाच एक मोठा पुरस्कार समजतो” असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. अंकुश जाधव याने कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त केले आणि श्रीष कांबळे यांने मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग उपपरिसर संचालक श्रीपाद वेलींग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.