*सावंतवाडी विधानसभा उमेदवारी मिळण्याच्या अटीवर एका माजी आमदाराची पक्षांतराची तयारी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघ, कुडाळ मालवण मतदार संघ हे युतीच्या काळात शिवसेना पक्षाकडे तर कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेला होता. भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता देवगड मतदार संघातून निवडून आलेले आम.नितेश राणे हेच येत्या विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असून कुडाळ मतदार संघातून वैभव नाईक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खास.निलेश राणे यांनी आपल्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली आहे. सावंतवाडी मतदारसंघातून यापूर्वी तीन वेळा विक्रमी मतांनी निवडून आलेले सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर हे शिवसेना शिंदे गटाचे प्रबळ दावेदार असतील तर त्यांच्या विरोधातील उमेदवार मात्र कोणीही निश्चित झालेला नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना-भाजप युती असताना देखील दीपक केसरकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. परंतु दीपक केसरकर यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नव्हता, आणि दीपक केसरकर हे दहा हजार पेक्षा जास्त मते घेऊन सावंतवाडी वेंगुर्ला मतदार संघातून तिसऱ्यांदा आमदार झाले. शिवसेना शिंदे गट व भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद त्याचबरोबर मुंबई व कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले.नाम.दीपक केसरकर यांचा शिवसेनेतील सध्याचा वाढता प्रभाव पाहिला असता भविष्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाम.दीपक केसरकर यांनाच मिळण्याची शक्यता अधिक असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे देखील दीपक केसरकर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने सावंतवाडी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना शिवसेना भाजपा युती झाल्यास भाजपाकडून सावंतवाडीची उमेदवारी मिळणे कठीण आहे.
भविष्यातील निवडणुकीत युती कोणाची असो अथवा नसो सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सावंतवाडी मतदारसंघासाठी अजून तरी कोणीही मोठा नेता उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक असलेला दिसत नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी राखीव असल्याचे चिन्ह दिसत आहे. याचाच फायदा घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळण्याच्या अटीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक माजी आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आजकालच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला असता लोकहितासाठी कोणीही लोकप्रतिनिधी झटत नसून केवळ स्वार्थासाठी पक्षांतर करून आपली पोळी भाजून घेताना दिसत आहे. प्रत्येक राजकीय इच्छुक नेत्याची इच्छा असते की तेथील जनतेने आपला आमदार बदलावा आणि नवीन उमेदवार म्हणून आपल्याला संधी द्यावी, मग पक्षनिष्ठा किंवा स्वाभिमान असा कुठलाही मुद्दा आड येत नाही.