You are currently viewing तुम्ही तुमचा आमदार बदला,.

तुम्ही तुमचा आमदार बदला,.

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात शिवसेना भाजपा युती सरकारकडून मंजूर झालेल्या ३००० कोटींच्या निधी बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सहकारी मंत्र्यांचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सावंतवाडी हे काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत असताना आरोग्याचे मुख्य केंद्र होते. परंतु उपजिल्हा रुग्णालय दर्जा झाल्यानंतर मात्र सावंतवाडीच्या सरकारी रुग्णालयात ना धड औषध गोळ्या मिळत ना इंजेक्शन भेटत. त्यामुळे पत्रकारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर निधीचा आकडा दाखवता परंतु सावंतवाडी मधील रुग्णालयातील असुविधांचा पाढाच वाचला. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नंतर करा आधी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक सुविधा निर्माण करा अशी मागणी केली. यावर राजन तेली यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करून तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचविले. परंतु त्यानंतरही प्रश्नांवर प्रश्न येत राहिल्याने राजन तेली यांनी हे प्रश्न सुटावेत अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा आमदार बदला, असे सांगून ना.दीपक केसरकर यांना टोला लगावला. आंबोली येथील कबुलायतदार बागायत प्रश्न देखील श्रेय वाद बाजूला ठेऊन, विरोधासाठी विरोध न करता मल्टीस्पेशालटी हॉस्पीटल प्रश्न देखील एकत्र येऊन सोडवावा असेही सांगितले.
“तुम्ही तुमचा आमदार बदला” असे सांगताना राजन तेली यांनी आपणच सावंतवाडी मतदारसंघासाठी आमदार म्हणून दावेदार असून भविष्यात आपल्याला संधी मिळावी अशी अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली. खरंतर सावंतवाडीच्या आजपर्यंतच्या आमदारांकडे एक कटाक्ष टाकला असता, सर्वजण स्वच्छ चारित्र्याचे, कोणताही गुन्हा आजपर्यंत दाखल नसलेले आहेत. ना.दीपक केसरकर हे तर पिढीजात श्रीमंत घराण्यातील. संस्थानकाळात नगरसेठ म्हणून ओळख असलेले केसरकर यांचे घराणे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जणू जन्माला आले होते. ना.केसरकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. राजकारणातून श्रीमंती आली नसून वडिलोपार्जित श्रीमंती असलेली व्यक्ती. प्रचंड हुशारी आणि बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची शालेय शिक्षणमंत्री पदावर वर्णी लागली, एकनाथ शिंदेंनी त्यांची हुशारी आणि सर्व भाषांवरील प्रभुत्व यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत नारायण राणे यांनी अपमान केला, तो सावंतवाडीकरांचा अपमान होता.त्यावेळी “मी सुद्धा एकदा पालकमंत्री होईन” अशी दर्पोक्ती करणारे केसरकर केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नव्हे तर आपल्या मंत्रिपदाच्या दुसऱ्या टर्म मध्ये महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचे आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री बनले. ना.केसरकर जनतेतून तब्बल तीन वेळा विक्रमी मतांनी निवडून आलेत, कधीही मागच्या दाराने आमदार झाले नाहीत. त्यामुळे केसरकरांच्या विरोधात सावंतवाडीत बोलणाऱ्याचे आजपर्यंत पानिपत झाले आहे हा इतिहास आणि वस्तुस्थिती आपण सर्वांनी पाहिली, अनुभवली आहे.
शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष परशुराम उपरकर यांना विधानसभेवर घेतल्याने नारायण राणे यांनी राजन तेली यांच्यासाठी जीवाचे रान करून विधानपरिषदेवर आमदार केले होते. त्यामुळे राजन तेली यांना लॉटरी लागली होती. राजन तेली यांचा राजकीय उदय झाला तो नारायण राणे यांच्यामुळेच…! आज जिल्ह्यात भाजपाची अनेक ठिकाणी सत्ता असल्याने भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांना ना.दीपक केसरकर हेच अडसर ठरले आहेत. मागील निवडणुकीत केसरकरांनी तेलींचा सपशेल पराभव करून त्यांना सावंतवाडी मतदारसंघ हा बुद्धिजीवी लोकांचा मतदारसंघ असल्याचे दाखवून दिले होते. आज केसरकर यांच्या विरोधात बोलल्यावर माणूस मोठा होतो जसा मोदींच्या विरोधात बोलल्यावर माणूस मोठा झाल्यासारखे अनुभवून घेतो तसाच प्रकार झाला आहे. केसरकरांची मोदीं सोबत बरोबरी करत नसून एक उदाहरण म्हणून उल्लेख केला. पण हे देखील खरे आहे की, सावंतवाडीत शहराच्या बाहेरून आलेले नेतेच केसरकरांच्या विरोधात बोलतात आणि त्याला शहरवासीय मात्र किंमत देत नाहीत. हे केसरकरांना होणाऱ्या मतदानावरून वारंवार दिसून आले आहे.
राज्यातील सत्तेत एकत्र बसायचे आणि मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका करायची ही संस्कृती केसरकरांची कधीच नव्हती, ती केवळ भाजपाच्या इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांकडून सावंतवाडीत दिसून येत आहे. कारण सावंतवाडी मतदारसंघ ते कधीच जिंकू शकलेले नाहीत. काम करण्याची जिद्द, सत्ताधारी पक्षाकडून निधी आणि प्रामाणिकपणा असला तर नक्कीच सावंतवाडीत आमदार बदलाची गरज उरणार नाही, तर विरोधकांनी विरोधासाठी विरोध न करता एकत्र येऊन जसे राज्यात सत्तेत बसता तसे जिल्ह्यात बसणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा