उपजिल्हा रुग्णालयातील औषध तुटवड्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांचे वेधले लक्ष
चालकांअभावी बंद रुग्णवाहिका सुरू करण्याच्याही केल्या सूचना
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन व औषधांचा तुटवडा असून काही रुग्णवाहिका चालकाअभावी धुळखात पडल्या आहेत. १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य विषयक या गंभीर बाबींकडे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे पत्रकारांनी लक्ष वेधल्यानंतर राजन तेली यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधत या गोष्टींबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना दिल्या. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा करणार असून आरोग्याच्या विषयावर कोणी हयगय करीत असल्यास त्याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तापसरीची इंजेक्शन तसेच औषधे यांचा तुटवडा असून रुग्णांना ती खाजगी मेडिकल स्टोअर्स मधून खरेदी करून आणावी लागतात. त्यामुळे रुग्णांची तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होत आहे. याचा प्रत्यय सावंतवाडीतील दोन पत्रकारांनाही आला असून याबाबत पत्रकारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना माहिती दिल्यानंतर राजन तेली यांनी पत्रकारांच्या समक्ष जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला. त्यावर तुटवडा असणारी औषधे व इंजेक्शन मागविण्यात आली आहेत ती काही दिवसातच प्राप्त होतील. मात्र, तोपर्यंत तालुका पातळीवर तीन लाखांपर्यंतची औषधे खरेदी करावी असा ठराव रुग्णकल्याण समितीच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राजन तेली यांनी दिली.
दरम्यान, खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या तसेच आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आलेल्या काही रुग्णवाहिका चालकांअभावी धुळखात पडल्या असल्याची तक्रारही यावेळी राजन तेली यांच्याकडे करण्यात आली. त्याबाबतही राजन तेली यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून माहिती जाणून घेतली. याबाबत रोजंदारी ( डेली वेजिस ) तत्वावर चालकांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात आवश्यक असलेल्या रुग्णवाहिका शासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्या बंद अवस्थेत असतील तर चालक उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनाही आपण माहिती देणार असून पालकमंत्र्यांच्या कानावरही ही बाब घालणार असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली.त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला असल्याचेही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर हा अतिशय गंभीर विषय असून आरोग्य प्रशासनाकडून त्यात कोणी हयगय करत असल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.