आज ३१आँक्टोबंर, जागतिक किर्तीच्या पोलादी महिला आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी यांचा स्मृतीदिन…आणि याचं नेमक्या याचदिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत लक्षवेधी काम केलेल्या माझ्याचं नव्हे तर सर्वाच्या आदरणीय आणि लाडक्या मिराताई जांधवांच निधन…एक घरातीलच आशिर्वाद, प्रेरणा आणि उर्जा देणाऱ्या आपल्याच माणसाचं निधन झाल्याची भावना…
बातमी समजली आणि मी प्राणापलीकडे जपून ठेवलेला माझा दस्तऐवज म्हणजे मला अशा महनीय आणि समर्पित महानोभवांची आलेँली जुनी पत्र चाळायला सुरु केली. मिराताईने मला तशी अनेक पत्र पाठवली, वेळोवेळी घरगूती किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा/ आशिर्वाद दिले. त्यापैकी माझ्या लग्नाला २५वर्षे पुर्ण झाली म्हणून पाठवलेलं पत्रही होतं.
मी या सुंदरवाडीत १९८१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो तेव्हा सुरूवातीच्या काळात ज्या दहाबारा घराण्यांशी माझे स्नेहबंध जुळले त्यात धारणकर कुटुंबिय हे एक घराण होत. वेलकम छापखाना, नाट्यदर्शन, वि.स.खांडेकर शाळा यामुळे मिराताईंचा आणखीन सहवास मिळाला. माझ्या मुलीचं त्याना विशेष कौतुक. स्नेहलने एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली याचा त्या वेळोवेळी उल्लेख करत. मला आठवत कळसुलकर हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात त्या आल्या होत्या. त्यावेळी स्नेहल व छोटी प्रिया या दोन्ही मुलीनी क्रष्णलिला हे न्रुत्य सादर केल होत. ते पाहिल्यावर भरभरून कौतुक केल.. मला व माझ्या सौ.ना म्हणाल्या “नक्षत्रासारख्या मुली आहेत तुमच्या, घरी गेल्यावर त्यांची द्रुष्ट काढा”
महिला सबलीकरणाणी खरी मुहूर्तमेढ त्या काळात मिराताईनी रोवली होती. आज शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण आणि दुरावस्था पाहिल्यावर खरोखरच मिराताईंची प्रकर्षाने आठवण होते. त्या काळात शिस्तबद्ध आणि आदर्श शाळा कशी असावी? याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिराताईं मुख्याध्यापिका असलेली वि.स.खांडेकर ही शाळा. त्यावेळी शाळा तपासणीसाठी येणारे अधिकारीही मिराताईना वचकून असायचे. त्यांच्या मनात ताईंबद्दल आदरयुक्त भिती असायची याचे कारण ताईंची आदर्श व रोखठोक कार्यशैली.
दक्षिण कोकणात स्व.बाप्पा धारणकरांच्या काळात धारणकरांचे घर म्हणजे नाट्यचळवळीचा केंद्रबिंदू.अनेक नामवंत मराठी कलाकारांची त्यांच्या घरी रेलचेल असायची. शाळा, सामाजिक कार्य आणि संसार हे सगळं सांभाळत असताना ताईंची खूपच दमछाक होत असे पण ते त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कधीच जाणू दिलं नाही. येणाऱ्या- जाणाऱ्यांचे त्या अगदी अस्सल मालवणी भाषेत हसतमुखाने स्वागत करत असत.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला सबलीकरण अशा एक नाही अनेक क्षेत्रातील कार्य अचंबित करणारं आहे..पुरस्कारांची भली मोठी यादी आहे. १९७४मध्ये त्यांना पहिला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर ही मालिका सुरुचं राहिली.महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, कुटुंब कल्याण पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पत्रकारिता व शिक्षण यासाठी मिळालेला प.पु.बापूसाहेब महाराज पूरस्कार, दर्पण पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, कै.भाईसाहूब साव़त पुरस्कार, जनकल्याण सेवा पुरस्कार, सिंधू रत्नभूषण पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, रोटरी क्लब पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले.
स्व.इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीत्वाचा त्या़च्यावर विशेष प्रभाव होता. त्यांच्या बोलण्यातून ते सतत जाणवत होत.साप्ताहिक सत्यप्रकाशची संपादक म्हणून अनेक वर्षे यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. आपल्या रोखठोक संपादकीय मधून अनेकं प्रकरण उजेडात आणली. संस्कारक्षम शिक्षणाचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. अगदी गेल्या वर्षापर्यंत त्या सत्यप्रकाश मधून बोधकथा लिहित असतं…
पण काळापुढे काही चालत नाही. सतत निकोप समाज व्यवस्थेसाठी लिहिणारे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे प्रेमळ हात आज सकाळी सहा वाजता वयाच्या ९३व्या वर्षी कायमचे थांबले. सिंधुदुर्ग आणि विशेषतः सुंदरवाडीच्या वैभवात ज्यांनी आपल्या अफाट बुद्धीच्या व आदर्श कार्यपद्धतीने भर घातला अशा आमच्या लाडक्या मिरताईनी कोचरा येथे आपल्या घरी शेवटचा निरोप घेतला.
मिराताई, माझ्या सामाजिक जडणघडणीत आपली प्रेरणा आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मी कधीच विसरू शकणार नाही.
सिंधुदुर्गच्या या सावित्रीबाईंस अटल व स्नेहप्रिया परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
...अँड.नकुल पार्सेकर…