*शिवसेना विभाग प्रमुख फिलिप्स अंतोन रॉड्रिक्स यांनी केली आरटीओ कडे तक्रार*
सावंतवाडी :
इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील काळ्या दगडाच्या खाणीवरून होणाऱ्या अनधिकृत व ओव्हरलोड वाहतुकीतबाबत शिवसेना विभागप्रमुख फिलिप्स आंतोन रॉड्रिक यांनी आरटीओ सिंधुदुर्ग यांच्या दफ्तरी रीतसर तक्रार देऊनही आरटीओ अधिकाऱ्यांवर अनधिकृत धंदेवाल्यांशी लागेबांधे असल्याने इन्सुली तालुका सावंतवाडी येथील खानीवरून गोवा येथे होणाऱ्या दगड, खडीच्या अनधिकृत आणि ओव्हरलोड वाहतुकीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
इन्सुली, वेत्ये (ता. सावंतवाडी) येथील खणीवरून गोवा येथे दोन ब्रासची महाराष्ट्र सरकारला रॉयल्टी भरून चार ब्रास खडी, डबर आदी वाहतूक नियमित सुरू असून सदरच्या वाहतुकीकडे जिल्ह्याचे आरटीओ, पोलिस, महसूल अधिकारी हेतुपुरस्सर कानाडोळा करतात. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत असून अनधिकृत व्यवसायाला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हात नियमित ओले होत असल्याने अधिकारी “घर भरून दार ओतत” असल्यासारखे पैसे कमवित आहेत. शिवसेना विभाग प्रमुख फिलिप्स आंतोन रॉड्रीक्स यांनी जिल्ह्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांना पत्र देत सदरची प्रत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, खनिजकर्म विभाग सिंधुदुर्ग, पोलिस निरीक्षक बांदा, तहसीलदार सावंतवाडी आदिंकडे देखील तक्रार देत पोच घेतली आहे. परंतु लाच घेऊन गब्बर झालेले अधिकारी मात्र तक्रारीवर कोणतीही कारवाई न करता गब्बर झालेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी डंपर भरून घराच्या कामासाठी माती नेली तरी डंपर मालकावर लाखांचा दंड लावणारे तलाठी, तहसिलदार, पोलिस यांना देखील अनधिकृत रित्या चार चार ब्रास माल भरून गोव्याकडे जाणारे डंपर दिसत नाहीत का…? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ओव्हरलोड माल भरून जाणारे डंपर दोन ब्रासचा पास घेऊन चार ब्रास वाहतूक करत असल्याने आपल्या गाड्या भरधाव वेगाने हाकतात, त्यामुळे नित्याने छोटे छोटे अपघात होतंच राहतात. त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध माणसे,व पादचारी यांना जीव मुठीत धरून रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. अधिकारी वर्ग आपली तुंबडी भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालत असून सरकारी तिजोऱ्या मात्र खडखडाट करून ठेवत आहेत. योग्य वेळी अशा अनधिकृत ओव्हरलोड वाहतुकीवर निर्बंध आले नाहीत तर काळ सोकावेल आणि जनतेचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही.
सदर प्रकरणी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेना विभाग प्रमुख फिलिप्स आंतोन रॉड्रिक्स इन्सुली येथील आरटीओ तपासणी नाक्यावर आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले असून त्यासमयी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आरटीओ सिंधुदुर्गला जबाबदार धान्यात यावे अशी तंबी दिली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींना वारंवार आंदोलन करावे लागते हो खेदाचीच बाब होय…!