विविध राज्यातून सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग; दिग्गजांकडून मार्गदर्शन…
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद पार पडली. कॉलेजने सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीयस्तरावरची परिषद आयोजित करून आपली ओळख कायम ठेवली आहे.
परिषदेचे उद्घाटन सावंतवाडीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजेश नवांगुळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कृष्णा अय्यर, गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ.शैलेंद्र गुरव, श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, प्राचार्य डॉ.विजय जगताप उपस्थित होते. या परिषदेमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक,मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यातून ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी व अध्यापक सहभागी झाले होते.
डॉ.राजेश नवांगुळ यांनी वैद्यकीय क्षेत्र आणि औषधनिर्माणशास्त्र यांच्यामधील परस्परावलंबनाची माहिती दिली. त्याचप्रमाणे पारंपारिक वनौषधींवर संशोधन करून त्यांचा आधुनिक वैद्यक शास्त्रात समावेश करण्याला चालना द्यायला हवी असेही मत व्यक्त केले. डॉ.विजय जगताप यांनी औषध निर्माण शास्त्रातील विविध संधी यावर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. तुषार रुकारी यांनी मागील चार वर्षात पार पडलेल्या परिषदांचा आढावा घेत अशा परिषदा आयोजित करण्याचे महत्त्व सांगितले.
दुपारच्या सत्रात डॉ.अय्यर यांनी सायटोक्रोम पी -450 या जैव उत्प्रेरकाचे फार्माकोकायनेटिक्स आणि चयापचय क्रिया यामधील महत्त्व विशद केले. डॉ.गुरव यांनी आयुर्वेद व जीवशास्त्र यांचा आरोग्य व्यवस्थापनातील एकात्मिक दृष्टिकोन स्पष्ट करत आयुर्वेदातील एक महत्त्वपूर्ण औषधी घृताचे महत्व सांगितले.
सायंकाळच्या सत्रात शंभरपेक्षा जास्त शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांचे परीक्षण करून उत्कृष्ट सादरीकरणाला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देण्यात आली. यामध्ये पदविका विभागातून प्रथम पारितोषिक रु.2500/- हर्षल सूर्यवंशी ( यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी), द्वितीय पारितोषिक रु.2000/- आकाश अशोक चव्हाण ( दादासाहेब चव्हाण मेमोरियल फार्मसी कॉलेज माळवाडी- कराड), तृतीय पारितोषिक रु.1500/- सुचिता श्रावण कांडरकर (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना देण्यात आले. पदवी विभागातून प्रथम पारितोषिक रुपये रु.3000/- गौरव गजानन भावे (इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सडवली ता. संगमेश्वर) द्वितीय पारितोषिक रु.2500/- विनिती मिलिंद महाले ( सर डॉ.एम.एस.गोसावी फार्मसी कॉलेज, नाशिक) तृतीय पारितोषिक रु.2000/- नम्रता मंगेश घाडी ( यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना देण्यात आले. पदव्युत्तर विभागातून प्रथम पारितोषिक रु.5000/- अस्मिता जगराम लोधी ( महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे) द्वितीय पारितोषिक रु.3000/- मृणाली नवीन कंटक (गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, पणजी) तर उत्तेजनार्थ पारितोषिक जतीन अरुण टेकावडे (यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी) यांना देण्यात आले.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गौरी भिवशेठ यांनी केले. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ.रोहन बारसे, डॉ.प्रशांत माळी, प्रा.विनोद मुळे, प्रा.रश्मी महाबळ, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, प्रा.ओंकार पेंडसे यांनी मेहनत घेतली.