You are currently viewing संवेदनशीलता उराशी कवटाळणारी: एक होती गंगा

संवेदनशीलता उराशी कवटाळणारी: एक होती गंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच सदस्य लेखक कवी सुधीर शेरे यांच्या “एक होती गंगा” कथा संग्रहाचा श्री.चंद्रकांत गायकवाड यांनी दिलेला पुस्तक परिचय*

 

*संवेदनशीलता उराशी कवटाळणारी: एक होती गंगा*

 

लेखक, कवी सुधीर शेरे यांचे दुसरे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाचा संवेदनशील शिक्षक असून, विद्यार्थी आणि दैनंदिन कामे यातून सवडीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्थित्यंतरावर अधिकार वाणीने भाष्य करणाऱ्या भाष्यकारांपैकी एक. वेस कविता संग्रह भारतीय समाज वास्तवाचे भान जागृत करून,आता आपल्या विचारांची वेस विस्तारलीच पाहिजे.हे मनावर कोरून जातो.

कथा वाङ्मय निर्मितीचा आनंद सृजनशीलतेला जागे करतो.अन् नव्या विषयाची बीज अंकुरत जातात. आणि जन्माला येते. ‘एक होती गंगा ‘ एकोणिसाव्या शतकात नव्या कथेचा जन्म झाला. नव्या समस्या,नव विचार आचार संहिता साहित्य क्षेत्रात येऊ लागली. पण मूळ भारतीय प्रश्न अद्यापतरी सुटलेले नाहीत. हे नाकारता येत नाही. गावगाडा, पाटील, जमीनदार, मामलेदार हे खणपट्टीला आजही बसलेले दिसून येतात. आंबेडकरी कथा ( दलित साहित्य) त्यातून येणारं भयाण वास्तव लपवून राहिलेलं नाही. स्त्री -पुरूष भेद, जात, धर्म,पंत, अंधश्रद्धा यातून समाज सुटलाच नाही. ” विटाळात हात धरणारी प्रवृत्ती अजूनही आहे.”

यासर्व दुःखातून दुःख उजागर करण्यासाठी आकाराला येते गंगा…. लेखकाच्या चिंतनशील प्रवृत्तीला नवे विषय.नवे पात्र त्यांच्या तोंडची भाषा वेदनेचा एल्गार करत अक्षर रुपाने अधोरेखित होते. समानता, न्याय आणि स्वातंत्र्य यांची अपेक्षा आजही करावी लागते? शिक्षण, आरोग्य आणि निवारा याची भीक मागावी लागते. या सर्वांवरचे रामबाण औषध शिक्षण आहे. हे लेखकांना प्रकर्षाने जाणवत जाते. हे कदाचित शिक्षकीपेशाचा, चेहरे वाचन्याचा, चिंतनाचा दांडगा आवाका हा कलानिर्मितीच्या मुळाशी आहे. त्यांच्या कथालेखनावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखन शैलीचा प्रभाव दिसून येतो. माणदेशी भाषा, माणसे आणि परिसरातील वेदना शब्दातीत होताना दिसते.चवणेसरी भाषा ही त्या पंचक्रोशीतील लोकांची बोली आहे. दर दहा कोसांवर भाषा बदलली जाते,हे खरेच आहे. तिचा हेल,लकब, उच्चार पद्धत. अर्थात त्या मातीचा गंध अक्षरांशी नाते सांगतो आहे. हा भाव कथा वाचताना जाणवत राहतो.

प्रस्तुत कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत. स्त्री प्रधान कथा आहेत. मुंळी, लॉकडाऊन, एक होती गंगा, शिकार,पालवी,आवातणं आणि ताया या खूप ताकदीने समाज मनावर संस्कार करण्याची अभिलाषा ठेवून निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाच्या बाबतीत अगदीच पोटतिडकीने व्यक्त होताना दिसतात. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आईवडील. शिक्षणच नव्या वाटा निर्माण करू शकतात.ते आपल्या लेकरांच्या वाट्याला नको,असे यमाला वाटते. ही संवेदना लौकिक अर्थाने खूप मोठी बाब आहे.

लिंगभेद हा सुसंस्कृतपणा नसून ती प्रगतीतील मोठी अडगळ आहे. आजही समाजात हा भाव जोपासला जातो. कोण पुढारलेले हा प्रश्न दशरथ उभा करतो. कोरोना काळात झालेली शिक्षणाची परवड, प्रत्यक्ष वर्गाध्यापनाचे महत्त्व अधोरेखित होते. आदिवासी समाजात लिंगभेद पाळला जात नाही. वारली समूहाचे पुढारलेपण दशरथ सांगताना पांढरपेश्या संस्कृतीचे मालक अचंबित होतात.

अनाथच अनाथांची सावली होते. समाजात आजच्या काळात काही चांगल्या विचारांची माणसे आहेत. त्यांच्या कामामुळे अनेकांच्या जीवनात नवा सूर्य उगवला आहे.काका आजोबा,शिक्षक हे नात्याबाहेरील नाते आहेत. असे नाते पालवीच्या जीवनात येते. ह्या नकोशा असलेल्या मुली….. टाकलेल्या, फेकलेल्या त्या जीवनाचा आधार शोधत असतात. हेच पालवी आईबा यशवंते नावाने उजागर होते. वाचन संस्कृती, माय, आपलेपणा…. मग काय अनेक यशोगाथा निर्माण होतात. पालवी – चैत्रपालवीच्या बहराने बहरून येते. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक स्थित्यंतराच्या चटक्याने होरपळून, पुन्हा नव्याने फुललेल्या पालवी सारखी. कोणीतरी पुरुष पालवीचे आईबाबा होऊन ममत्वाने आकार आयुष्याला दिला जातो. इथे मला भेटलेल्या शेरे सरांचे मातृहृदय दिसते. अनेकदा अनेकांना संवेदनशीलतेने आपलं मानलं सरांनी…….

भारतीय स्त्री ही गण संस्कृतीचा वारसा सांगणारी आहे. प्रसंगी हाती शस्त्र घेतलेल्या आम्ही,पण सद्यस्थिती भयावह आहे. आर्यांच्या आक्रमणाने मातृसत्ताक पद्धती संपुष्टात आली. वैदिक धर्म, संस्कृती बाळसे धरू लागली. हीन, वासनांध,नाशाचे कारण, वगैरे वगैरे बोल बायकांना लावले जाऊ लागले.इतिहास कधीच कृतघ्न नसतो. तो वसा आणि वारसा पुढील पिढीसाठी संक्रमित करीत असतो. जिजा, लक्ष्मी, अहिल्या, ताराराणी यांचा वारसा ताया मध्ये दिसतो. प्रत्येक बापाने मुलीला स्व-रक्षणाचे धडे दिले पाहिजेत.मग मुलीच्या वागण्यात, बोलण्यात धार येईल,ती स्वतःला अबला कधीच समजणार नाही.

“मर्दुमकी दावतयस व्हय,भर वस्तीत गावात अशी हिंमत दाव,की बघू तुझी मर्दानगी.गरीब पुरीवं झडप घालतूस थू ss तुझ्या जीण्यावं…..”

सगुणा पारंपरिक असली तरी, ताया बापू आधुनिक विचारांची कास धरून जगण्याचा मार्ग निवडतात. मुलगा मुलगी भेद नको. गावातील सर्व मुलींना एकत्र करून आत्म रक्षणासाठी कार्य केले जाते. लुटीचा प्रयत्न हाणून पाडला जातो.याकामी तिला पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो.

भाव भावकी तिचे सवतेसुभे शिकार कथेतून येते.गणू स्वाभिमानाची शिकवण देतो. महदूकाका खलवृतीचं प्रतिनिधीत्व करतो. आईच्या मनात बापाच्या जाण्याची अनामिक हुरहुर आहे.म्हणून सुऱ्याच्या बाबतीत ती गंभीर होत असते. आवातणं कथेतून गरिबीचा फायदा घेणाऱ्या प्रवृतीवर हल्ला चढवला गेला आहे. पांडबा पारी बाळ्या आणि तानी स्वतःचं सारं देऊन शिळ्या पाक्याची वाट बघत असतात. बुद्ध तत्त्वज्ञान सांगताना भगवान मास्तर आणि सिध्दार्थ तथागताची करुणा सांगताना दिसतो. विटाळात हात धरणारी प्रवृत्ती अजूनही गेलेली नाही. हे जाणवायला लागते.

सत्यकथा या कथासंग्रहातील, ‘एक होती गंगा’ गंगा अनाथ असून तिची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे.तिच्या आयुष्यात आलेल्या सर्वांचा अंत झाला, म्हणून पोलिस साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवतीला म्हणते, “साहेब मला तुम्हाला गमवायचे नाही.” हे शहाणपण येतं कुठून….. सोनवणे,वर्षा, समाधान मानव आणि तिचा मामू हे पात्र वैराण वाळवंटातील हिरवळीसारखे आहेत. भिक मागताना रेल्वे गाडीत भेटणारी गंगा मैत्रीण संवेदनशीलतेचा मानबिंदू ठरते. तिने तिचे नावच वापरण्याची मुभा देते. गंगा लिंबादास भोसले हे औदार्य माणसात असायला हवे. ती बाल वयातील समज खूप मौल्यवान आहे. सुधाकर माने,सुधा माने पूर्वायुष्याचे ऋणानुबंध जुळल्यासारखी आत्मीयता दाखवतात. समाजात आज दुभंगलेपण,जात पात धर्म मानसिकतेचा कहर असताना. मानवतेचे दर्शन घडते.हे लेखकाचे सामर्थ्य आहे.

ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्तारत असताना, अनेक प्रश्न कथा उभे करते. त्या प्रश्नांना पर्याय देते. पोटापाण्याचे, रोजगाराचे, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न उभे राहतात. पात्रांच्या तोंडची भाषा ग्रामीण बोली. वाक्प्रचार आणि म्हणींचा वापर,नवी शब्दकळा. त्याचा यथायोग्य वापर, वाचकांच्या मनाचा ठाव घेते.चटकदार छोटी वाक्य रचना, बहुजन समाजाचे जीवन अधोरेखित करते. या बाबी सर्व कथेंची उंची वाढवतात. हा कथासंग्रह समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर यान प्रसिद्ध केले आहे,तर देखणे असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे. कथाकार सुधीर शेरे यांना पुढील लेखनासाठी मंगल सदिच्छा….!

 

लेखक: चंद्रकांत गायकवाड

मुखेड.

दूरभाष: 9421838621

कथासंग्रह :- एक होती गंगा

कथाकार :- सुधीर शेरे

प्रकाशन :- समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर

मुखपृष्ठ :- संतोष घोंगडे

मूल्य :- १२० रू.

प्रतिक्रिया व्यक्त करा