जिल्ह्यातील पारंपरिक लोककला जिवंत ठेवावी – निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्गातील पारंपरिक लोककला दशावतार, भजन, कीर्तन, कळसुत्री बाहुली, पांगुळ बैल अशा विविध लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले.
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य योजनांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आज झाली. या बैठकीस जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्र. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष भोसले, विस्तार अधिकारी आनंद कुंभार, सर्वश्री कलाकार सुभाष लोंढे, कृष्णा नाईक, भालचंद्र केळुसकर, सुहास माळकर, देवेंद्र नाईक, यशंवत थोटम आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सोनोने म्हणाले, जिल्ह्यातील पारंपरिक लोककला अजूनही कलाकारांनी जिवंत ठेवली आहे. इतर जिल्ह्यात ह्या पारंपरिक लोककला नसल्यामुळे या लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी कलाकरांनी उत्पन्न दाखला मिळण्यास उशिर होत आहे. या समस्या मांडल्या यावर बोलताना श्री. सोनोने म्हणाले, सर्व कलाकारांनी आपल्या तालुका, गाव निहाय नावांची यादी आवश्यक कागदपत्रासहित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. ही यादी तहसिलदारांमार्फत संबंधित तलाठी यांना पाठवून लवकरात लवकर कलाकारांना उत्पन्न दाखला मिळवून देऊ. जेणेकरुन लाभ मिळण्यास उशिर होणार नाही. त्याचबरोबर या अर्थसहाय्यपासून कोणीही वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे ते शेवटी म्हणाले.
प्रास्ताविकात प्र.जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. भोसले यांनी सन २०२१-२२ मधील २०८ कलाकारांना मानधन देण्यात आले आहे. तर सन २०२२-२३ या चालू वर्षी ४४ कलाकरांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावेळी समितीने पात्र कलाकारांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.