मालवण
मोकाट गुरांच्या त्रासाबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही अद्याप बंदोबस्त न झाल्याने २५ मार्चपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त वीज कर्मचारी कमलाकर खोत यांनी दिला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी मालवण पालिकेतील पथदीप दुरुस्तीसाठी अनेक नगरसेवकांना सहकार्य केले होते. आज अशा व्यक्तीवर न्याय्य हक्कांसाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. खोत यांनी हताशपणे पालिका प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याची खंत बोलून दाखविली.
आपण धुरीवाडा खोत मठ येथे कुटुंबियांसह राहतो. माझे वय ७२ वर्ष आहे. आमचे खोत कुटुंबियांचे एकूण १६ बिऱ्हाडे असलेले सामायिक घर आहे. आमचे खोत मठ या नावाने ओळखले जाणारे
परंपरागत मठ देवस्थान आहे. या ठिकाणी १०-१२ गुरे अन्य वाट असूनही आमच्याच मार्गाने सोडण्यात येतात. त्यामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाहतुकीला अडथळा येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज दिला असता, या अर्जाप्रमाणे १५ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांनी पाहणी करून संबंधितांना सात दिवसांची नोटीस देऊन गुरांचा योग्य बंदोबस्त करावा अन्यथा आपल्याविरुद्ध दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस २० फेब्रुवारी रोजी देऊनही हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे २५ मार्च रोजी सकाळी सातपासून पालिका कार्यालयासमोर आपण बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असा इशारा खोत यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.