वेंगुर्ला
वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालया नजिकच्या इमारतीवरील अनधिकृत दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अखेर आज सकाळपासून तोडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. हा बळी गेल्या नंतर हे अनधिकृत बांधकाम उजेडात आले. दरम्यान हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम सुरू असल्याने नगरपरिषदेने त्या भागातून जाणारी वाहतूक बंद ठेवली.
अनधिकृत बांधकाम तोडले जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वेंगुर्ला शहरात बंदर रोडला लागून ग्रामीण रुग्णालयानजिक विनायक परब यांची इमारत आहे. तळमजला व वरचा मजला अशी दोन्ही बांधकामे झाल्यावर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अनधिकृत रित्या सुरू होते. या दुसऱ्या मजल्याचे प्लँस्टरींगचे काम करताना शहरातील शुभम बाळू इंदुलकर या युवकास इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या ११ केव्ही विद्युतभारित वाहिनीच्या विजेचा शाॅक लागून त्याचा मृत्यू झाला होता.
या मृत्यूप्रकरणी त्याचे मामा जानू दत्तू तोडकर याने वेंगुर्ला पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार इमारत मालक विनायक परब व ठेकेदार तिलकराज गोंडा या दोघांवर गुन्हा दाखल झाला. संबंधित अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या मागणीचा विचार करून नगरपरिषद प्रशासनाने ईमारत मालक परब यांना बुधवारी लेखी नोटीस देऊन सदर अनधिकृत बांधकाम २४ तासात तोडावे, असे आदेश दिले होते. तसेच आपल्याकडून तसे न झाल्यास नगरपरिषद ते बांधकाम तोडणार असे स्पष्ट केले होते. नोटीस मिळताच आपले आणखी नुकसान नको या भीतीने परब यांनी आज सकाळपासून ते अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या भागातील नागरिकांना बांधकाम तोडताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासना तर्फे हा रस्ता बंद करण्यात आले आहे.