चंद्रकांत उर्फ बाळा गावडे…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांना ज्ञात असणारे सर्वसामान्य नेतृत्व म्हणजे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे….! इन्सुलीतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात प्रवेश केलेले बाळा गावडे यांचा राजकीय प्रवास खरोखरच थक्क करण्यासारखा आहे. इन्सुली सारख्या छोट्याशा गावातील ग्रामपंचायतचे सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती अशी मानाची पदे भूषवीत बाळा गावडे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सावंतवाडी विधानसभेची आमदारकी सुद्धा लढविली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्यानंतर प्रदेश काँग्रेसकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या खांद्यावर देण्यात आली. अल्पावधीतच बाळा गावडे यांनी काँग्रेसला चांगले दिवस दाखविण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडकळीस आलेली काँग्रेसची संघटना बाळा गावडे यांनी बांधली. बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आपले अस्तित्व जपत होती. बाळा गावडे जिल्हाध्यक्षपदी असताना कुडाळ नगरपंचायत वर काँग्रेसचा नगराध्यक्ष बसविण्याची काँग्रेस पक्षाने किमया साधली. त्यामुळे बाळा गावडे यांच्या नेतृत्वाची झलक अनेकांना दिसून आली. शिवसेना पक्षात असल्यापासूनच बाळा गावडे यांचे संघटन कौशल्य अफलातून होते. युवकांना एकत्र करत त्यांनी संघटना बांधली वाढवली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात नेहमीच त्यांना यश प्राप्ती होत राहिली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना आपल्या संघटन कौशल्यामुळे त्यांनी काँग्रेसची संघटना पुन्हा एकदा जिल्ह्यात उत्तमरीत्या बांधली. परंतु पक्ष वाढविण्यासाठी काम करत असताना स्वकीयांकडूनच त्यांना त्रास होऊ लागला. स्वतःला निष्ठावान म्हणणारे काँग्रेसचे काही लोकप्रतिनिधी, नेते सहकार्य करत नसल्याने बाळा गावडे यांची काँग्रेस पक्षात घुसमट होऊ लागली होती.
त्याच दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये खिंडार पडले आणि शिवसेना पक्षाचे दोन भाग झाले. बदलत्या राजकीय घडामोडीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी बाळा गावडे यांना शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी आग्रह धरला. कोणत्याही पदाची अपेक्षा अथवा अट न घालता बाळा गावडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आणि निस्वार्थीपणे पक्षकार्य सुरू केले. बाळा गावडे यांच्या याच निस्वार्थी कार्याची पोचपावती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने जाहीर झालेल्या नियुक्तीमध्ये मातोश्रीवरून चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे शिवसेना पक्षातील शिवसैनिकांकडून आणि विविध पक्षातील मान्यवरांकडून बाळा गावडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाचे दोन भाग पडल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी प्रबळ असे नेतृत्व नव्हते. चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या खांद्यावर शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी दिल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे देखील बाळा गावडे नक्कीच गांभीर्याने पाहून भविष्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदार संघ शिवसेनेकडेच राखण्याचा प्रयत्न करतील यातील मात्र शंका नाही.