औरंगाबाद :
त्रिरत्न बुद्ध विहार, टीव्ही सेंटर, सिडको, औरंगाबाद येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया औरंगाबाद च्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला पदाधिकारी व दामिनी पथक औरंगाबाद मध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांना पुष्पहार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महीला जिल्हाध्यक्ष डॉ. सावली राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष डी एन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे औरंगाबाद जिल्हा संघटक कवी एडवोकेट सर्जेराव साळवे तसेच कोषाध्यक्ष सूर्यकांत तेलगोटे व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाअध्यक्ष डि एन जाधव, जिल्हा संघटक अॅड सर्जेराव साळवे, जिल्हा कोषाध्यक्ष सूर्यकांत तेलगोटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महीलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे औरंगाबाद तालुका अध्यक्ष एडवोकेट कवी सर्जेराव साळवे यांची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीमध्ये संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डी.एन. जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने महिलावर्ग उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिसरण, पंचशील, वंदना घेण्यात येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तुत्वावर आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी एडवोकेट सर्जेराव साळवे म्हणाले की, ॑औरंगाबाद मध्ये कार्यरत असलेला दामिनी पथक मुळे शहरातील स्त्रियांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना आहे. एक कॉल येताच संकटात सापडलेल्या महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांना मदत करण्यासाठी अत्यंत तातडीने हे महिला पथक त्या ठिकाणी धावून जाते. महिलांना मदत करते. शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन मुलींना आत्मनिर्भर, स्वावलंबी तसेच निडर होऊन स्व-संरक्षण कसे करावे? याविषयीचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे शहरातील रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या महिला तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्व-संरक्षण करण्यास सक्षम बनत आहेत. याचे सर्व श्रेय हे दामिनी पथकाला जाते.॑ घर सोडून बाहेर काम करणाऱ्या तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना तसेच विद्यार्थिनींना वेळीच मदत मिळावी म्हणून दामिनी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपला मोबाईल नंबर महिलांना शेअर केला. त्यामुळे उपस्थित महिलांनी दामिनी पथकाचे आभार मानले . सत्काराला उत्तर देताना दामिनी पथकाच्या पोलीस अधिकारी यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा पंडित, जिल्हा कोषाध्यक्ष सूर्यकांत तेलगोटे, जिल्हा संघटक एडवोकेट सर्जेराव साळवे, डॉक्टर रेश्मा गरड, गायिका कनिका गाडेकर, महिला जिल्हा पर्यटन प्रमुख डॉक्टर अलका डोंगरे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोर्डे, महिला शहर अध्यक्ष सुनीता गाडेकर, महिला शहर महासचिव प्राजक्ता वानखेडे, महिला शहर संपर्कप्रमुख रेखा गवई ई. हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मनवर यांनी केले, तर डॉ. रेश्मा गरड यांनी आभार मानले.