ओरोस :
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न होणार आहे. सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथील सभागृहात करण्यात आले आहे. या सभेला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. अटारी पुणे चे संचालक व कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे विस्तार शिक्षण संचालक हे या सभेला खास उपस्थिती दर्शवणार आहेत. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी लिहिलेल्या थर्ड आय भाग – ४ या पुस्तकाचे प्रकाशन या सभेमध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण या मिटिंग मध्ये केले जाणार असून त्यावर सारासार चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन बाबत सभेत चर्चा केली जाणार असून या विषयी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत आपले विचार व्यक्त करणार आहेत. कृषी विज्ञान केंद्रा मार्फत समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प, नैसर्गिक शेती, परस बागेतील भाजीपाला लागवड, परसातील कुक्कुट पालन, फळ प्रक्रिया, वृक्ष लागवड अभियान, भरड धान्य लागवड अभियान इत्यादी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले आहेत. पुढील वर्षी अशा प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन कृषी विज्ञान केंद्रा मार्फत करण्यात आले आहे. या सभेला कृषी प्रतिष्ठानचे संचालक मंडळ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, शासनाचे जिल्ह्यातील विविध खात्यांचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विलास सावंत यांनी दिली.