कणकवली :
मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुरू झाले आणि मुंबई – गोवा महामार्ग जेवढा वेगवान बनला तेवढाच काही कारणाने जीव घेणा देखील बनला आहे. याला ठिकठिकाणचे अनधिकृत मिडलकट आणि राजरोसपणे हटविण्यात येत असलेले संरक्षण कठडे कारणीभूत ठरत आहेत. या अनधिकृत मिडलकटवरून तसेच उड्डाणपुलाखालून अचानकपणे कुठेही वाहने अचानक महामार्गावर येतात. त्याची कल्पना महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकाला येत नाही. यात होणाऱ्या अपघातामध्ये अनेकांचा नाहक जीव जात आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र महामार्गावर असलेल्या अनधिकृत मिडलकटमुळे या चौपदरीकरण महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असे अनधिकृत मिडल कट वाहन चालक व प्रवाशांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. जिल्ह्यात पाहिले तर खारेपाटण ते झाराप या केवळ ७३ किलोमीटरच्या क्षेत्रात तब्बल ५० पेक्षा जास्त ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. या अनधिकृत मिडलकटवरून वाहने वळवली जातात. त्याचवेळी १०० ते १५० किलोमिटर वेगाने येणाऱ्या वाहन नियंत्रित होत नाही. त्यामुळे अनधिकृत मिडलकटवरून वळणारी वाहने आणि त्यामधील वाहन चालक, प्रवासी अपघातामध्ये बळी जात आहे. साकेडी ते जानवली या दरम्यानच्या अनधिकृत मिडलकटवर आजवर असे अनेक अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
अनधिकृत मिडलकटप्रमाणे कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील संरक्षक कठडे हटविण्यात येत आहेत. वाहन पार्किंगसाठी हे कठडे हटविण्यात येत असल्याने वाहनांना मार्ग ओलांडण्यासाठी वाहन चालकांना नवनवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. मात्र हेच शॉर्टकट जीवघेणेही ठरत आहेत. कणकवली शहरातील हॉटेल मंजुनाथ ते नरडवे फाटा पर्यंत ओव्हरब्रिज खाली संरक्षणात्मक बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि इतर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी हे संरक्षक कठडे हटविण्यात आले. त्यानंतर अनेक हॉटेल, लॉज चालकांनीही आपापल्या ग्राहकांच्या वाहन पार्किंगसाठी संरक्षक कठडे हटविले आहेत. हे बॅरिकेट काढून टाकण्यात आल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी अनेक शॉर्टकट तयार झाले आहेत. वस्तुतः हे प्रकार राजरोजपणे होत आहेत. महामार्ग विभागाच्या परवानगी खेरीज हे कठडे हटवता येत नाहीत. परंतु शहरात कायदा धाब्यावर बसवून हे प्रकार होत आहेत. परंतु त्याची चौकशी आणि कारवाई केव्हा होणार असे प्रश्न सर्वसामान्य वाहनचालक व पादचारी वर्गातून उपस्थित केले जात आहेत.
कणकवली शहरात मागील काही दिवसांपासून छोटे – मोठे अपघात होत आहेत. काही अपघात होण्यास कणकवली शहरातील सर्विस रस्त्याला असलेले अनधिकृत बॅरिकेट्स कारणीभूत ठरत आहेत. तर काही ठिकाणी बॅरिकेट्स तोडून मिडलकट तोडून त्यातून रस्ता शॉर्टकट क्रॉस करण्यासाठी केलेले मिडलकट.! त्या मिडलकट वरून अचानक मुख्य सर्विस रस्त्यावर वाहन आले तर मागून येणाऱ्या वाहन चालकाचा वाहनाच्या वेगावरील कंट्रोल सुटतो आणि त्यामुळे बरेच अपघात होतात. काही दिवसांपूर्वी हॉटेल गोकुळधाम समोर सर्विस रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेला मागून आलेल्या कारची धडक बसली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. असे प्रकार शहरात घडू नयेत यासाठी शासन प्रशासनाने आणि यंत्रणेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच काही ठिकाणचा सर्विस रस्ता, पादचारी मार्ग हे जाहिरातीच्या बॅनरमुळे पादाचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे भाग पडत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नरडवे फाटा दरम्यान ओव्हरब्रिज खाली अधिकृत मिडलकट व्यतिरिक्त संरक्षणासाठी असलेले बॅरिकेट्स काढून केलेले मिडलकट वाहन चालकांना अपघाताच्या दृष्टीने धोकादायक ठरत असून हायवे संबंधित अधिकारी, प्रशासन, यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांमधून उमटत आहे.