*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*पाऊल*
तिला काही सांगायला हवं. कशा पद्धतीने सांगावं, याचाच मी विचार करत आहे.
तशी ती अजून लहानच आहे. तिचं वय आणि माझ्या मनातले विचार यातले अंतरही तसं जास्तच आहे. म्हणजे तिच्यापर्यंत माझ्या मनातलं सारं काही अर्थासकट पोहोचवणं, हे थोडं कठीणच आहे. पण त्याच वेळी, ते तिला समजणं हेही तितकंच जरुरीचं आहे.
सुरेश भटांची एक गझल मनात गुणगुणत आहे.
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा फसवून रात गेली
उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली ।।
आज याच गझली चा अर्थ मला अगदी निराळा वाटतोय. इतके दिवस वाटायचं हे एक प्रेम गीत आहे. निसटून गेलेल्या रात्रीतला विरह आहे. पण आता कळतंय हे एक स्थित्यंतर गीत आहे. जीवनातल्या पालटणाऱ्या टप्प्यांचं हे गीत आहे. रात्र उलटली म्हणजे एक स्थिती संपली आणि दुसऱ्या स्थितीचा आरंभ होत आहे.
वयकोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा फसवून रात गेली..
कोमल, कोवळं बाल्य कसं नकळतच संपून गेलंय् . बाळपणीचं चांदणं उरात उरलंय्, पण ते ताऱ्यांनी भरलेलं स्वप्नांचं गम्माडी आकाश मात्र दूर गेलंय्, हे सत्य आहे. बाल्य आता आठवणीत उरलंय् आणि आयुष्याच्या एका नव्या स्थितीचा आरंभ होतोय असं वाटतंय.
आयुष्य म्हणजे अनेक उंबरठे. प्रत्येक दोन उंबरठ्या मधलं जगणं म्हणजे एक स्थिती. आणि उंबरठे पार करत जाणं म्हणजेच नवे नवे आरंभ. नेमकं हेच मला तिला समजवायचं आहे.
ती ऋतुमती झाली आहे.
तशी लहानच आहे ना ती? शब्दांचे, स्थितींचे, लयींचे सगळेच अर्थ समजण्याचे आणि स्वीकारण्याचे तिचे वय तरी आहे का? ती जितकी घाबरली आहे तितकीच मीही भयभीत आहे. पण भयाभयातही पुन्हा फरक आहे. ती त्या डागांना घाबरली आहे. तसं अनपेक्षित म्हणता येणार नाही कारण, माझ्या गर्भातून जन्माला आलेला हा गोजिरवाणा गोळा, जसजसा आकारत चाललेला मी पहात होते, तेव्हा वेळोवेळी तिला मी सोबत येणाऱ्या निसर्गाच्या पावलांची ओळख देतच होते. पण अशा धाडकन जवळ आलेल्या निसर्गाला पाहून ती नक्कीच घाबरली आहे. आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तिला पाहून माझं उर दाटून आलं आहे. काहीसं चिंतीत आहे. धाकधुकलं आहे.
माझं भयच वेगळं आहे. मला आठवतोय तो माझ्या वेळचा काळ. मला नक्की काय वाटले होते त्यावेळी? आईने, गुपचुप, शांतपणे एका खोलीत नेऊन, अशावेळी काय करायचे असते, कशी काळजी घ्यायची असते ते सांगितलं होतं. आजीने मुद्दाम गोड खीर, त्यादिवशी बनवली होती. फुलवाल्याकडे जाऊन मोगऱ्याचे गजरे आणून केसात माळायला लावले होते. तिच्या चेहऱ्यावर ची हास्यमिश्रीत चिंता मला जाणवली होती पण तिच्या चिंतेपेक्षा मला तिचं चुपके चुपके हंसूच बोचत होतं. हिला एवढा आनंद कसला झालाय? मला मुळीच काही आवडलेलं नव्हतं. मन अगदी घेरून गेलं होतं. मैत्रिणींना काय सांगायचं? काय विचारायचं? त्यांच्या बाबतीत असं काही घडलं का? की फक्त माझ्याच बाबतीत? आणि हे असं का घडतं? एकाएकी मला माझ्यासोबत कालपर्यंत खेळणारा प्रकाश भाग्यवान वाटला होता! त्याला हे काही नाही. मलाच का? मला माझ्या शरीराची घृणा वाटली होती. एकाएकी मरूनच जावसं वाटलं होतं. त्या आकाशातल्या देवाचा प्रचंड राग आला होता. त्याला मला जाब विचारावासा वाटला होता. त्याचवेळी आजी म्हणाली होती,
” आता चार दिवस देवाजवळ जायचं नाही बरं का! तुला कावळा शिवलाय.”
म्हणजे मी अपवित्र, अस्वच्छ ,अस्पृश्य ?
मला काहीही पटलेलं नव्हतं. शरीरातली प्रचंड आंदोलने जाणवत होती. अनेक प्रश्नांना डोक्यात घेऊन मी त्या वादळांशी चक्क लढत होते. मला हे काही नको होतं. यापासून मला दूर जायचे होते. अगदी दूर, खूप दूर.
मी कधी स्थिरावले ते मला आता आठवत नाही. पण हळुहळु वादळं शांत होत गेली. मन स्थिर झालं. सवय होत गेली. स्वीकृती जाणवत गेली. माझ्यातली मीच नकळत बदलत गेले. तेव्हा कळलं नाही, काहीतरी उलटून गेलं आणि काहीतरी नव्याने सुरू झालं. पण देहातले वाहणारे झरे, हुरहुर लावायला लागले. लज्जा नावाच्या एका भावनेचा हळूच उगम झाला. आणि काहीसा आडदांडपणा, बेफिकीरपणा, मस्तीखोरी आपोआपच ओसरत गेली. अनंत स्पंदनांचा आणि भावनांचा हळुवार ओघ नव्यानेच जाणवू लागला. गल्लीतला माझा बाळमित्र प्रकाश मला एकाएकी बावळट वाटू लागला. आणि पडद्यावरचे देवानंद —नूतन मला आवडू लागले होते. मलाही त्यांच्यासारखे कुणाबरोबर तरी झाडामागे धावावेसे वाटले होते. हे सगळं नवीन होतं. एका वेगळ्याच दुनियेची ती सुरुवात होती. प्रवेश होता.
आज मला हे सगळं आठवलं आणि मनोमन खूपच हंसू आलं. नेमकं कसलं हंसू? त्या वेळच्या बालिशपणाचं की निसर्गाच्या करामतीचं? आपल्या विचारांचं की अज्ञानाचं?
रस्त्यावरून चालता चालता मधुर असा सुगंध जाणवला. सहज नजर उचलून पाहिलं, तर एक अंगोपांगी मोहरलेला डेरेदार आम्रवृक्ष दिसला. अतीव सुंदर! चैत्राची जाणीव देणारा. वसंत ऋतुच्या आरंभाची ओळख दाखवणारा. या ऋतुमती सृष्टीला पाहून मला, आता तिला काय सांगायला हवं, कसं सांगायला हवं, हे कळू लागलं होतं. उलगडू लागलं होतं.
आता तीही काहीशी सावरली होती. शाळेत जायची तयारी करत होती. बॅकपॅक मध्ये पुस्तकं,वह्या भरत होती. आज सोमवार होता. बरे झाले! शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे, निदान तिला दोन दिवस तरी या स्थितीत शांतपणे घालवता आले. मनासारखे चिडता आले. रडता आले. दोन दिवस तिने धड खाल्लेही नव्हते. खेळायलाही ती गेली नव्हती. कुणाशीही तिला बोलावेसे वाटत नव्हते.
तिने मला हेही विचारले होते,
” तू बाबांना सांगितलेस?”
मी तिला, “हो” म्हटले, तेव्हा तिने जोरात पाय आपटले होते.
पण आज मात्र ती शाळेची तयारी करत होती. मी दिलेला लंच बॉक्स तिने तिच्या बॅग पॅक मध्येही टाकला होता.
मी तिला सहज म्हटलं, ” बेटा !आज मी तुला गाडीतून सोडते. शाळेत स्कूल बस ने नको जाऊस.”
तेव्हां ती एकदम झेपावली. तिने माझ्या गळ्यात हात टाकले. घट्ट मिठी मारली. आणि हमसून हमसून ती रडायला लागली. माझ्या मातृत्वाच्या परीक्षेचा हाही एक नवा आरंभच होता जणूं!
या क्षणी तिला समजून घ्यायचे आहे. तिच्या मनातल्या शंका, भीती, अनंत प्रश्न मला सोडवायचे आहेत. त्यांची पटणारी नीट उत्तरं तिला द्यायची आहेत. ती लहान अननुभवी. तिचा आरंभ आणि माझा भूतकाळ, याचा सुंदर मेळ मला जमवायचा आहे. मला, तिला निसर्गाच्या या दानाचं कसं स्वागत करायचं ते सांगायचं आहे. कळीचं फुल होत आहे. फुलाच्या आयुष्याचा प्रारंभ किती सुखदायी, सुंदर, सुगंधी आहे हे मला तिला पटवायचं आहे. या स्थित्यंतराचा, एका नव्या सुरुवातीचा कसा स्वीकार करायचा हे शिकवायचं आहे. आणि निसर्गाने घडवलेला हा बदल किती सुंदर आणि सकारात्मक आहे याची जाणीव मला तिला द्यायची आहे. या कोवळ्या देहातलं एक स्त्रीबीज फुटत आहे, आकारत आहे. निसर्गाने दिलेला हा सन्मान आहे. हा डाग नाही. हा टिळा आहे. पवित्र, मंगलमय स्त्रीजन्माचा. तुझ्या देहातलं, निर्मितीचं शस्त्र आज तुला निसर्ग उघडून दाखवत आहे, त्याचा “तू आदर कर, अभिमान बाळग आणि आता या नव्या वाटेवरचं प्रत्येक पाऊल तू निर्भयतेने आणि जपून टाक. एका नैसर्गिक सोहळ्याचा हा शुभारंभ आहे असेच मान बेटा!”
या क्षणी तरी बाहेरच्या जगातल्या कावळे आणि गिधाडांबद्दल बोलण्यापेक्षा तिच्यातल्या शक्तीला जागृत करायचे आहे.म्हणून फक्त इतकेच,
।।शुभास्ते पंथान:सन्तु।।
राधिका भांडारकर पुणे.
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*