कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा.
कणकवली :
पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकास कामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे. अलिकडेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळयोजना चुकीच्या पद्धतीने व बाहेरील गावातील व्यक्तींकडून राजकीय स्वार्थासाठी राबविली जात असल्याने गावात गटतट निर्माण झाले आहेत. यामुळे गावातील सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याची भीती आहे. गावाला सद्य स्थितीत जुन्या योजनेवरून मुबलक व मोफत पाणी पुरवठा होत असल्याने आम्हाला गावात भांडणे निर्माण करणारी नळयोजना नको. शासन व लोक प्रतिनिधींनी सर्व प्रथम आम्हाला हक्काची ग्रामपंचायत द्यावी. नंतर आम्ही विकास कामे सुचवू असे श्री. पिळणकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून गेली बारा वर्षे आपण येथील समस्या सोडविण्यासाठी काम करत आहे. मात्र अलिकडे लगतच्या लोरे गावातील पिता-पुत्र पुढार्यांचा हस्तक्षेप वसाहतीत वाढला आहे. आम्हांला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार नाही यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. वसाहतीतील 275 पैकी 75 घरे लोरे ग्रा. पं. ला परस्पर जोडली आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने आम्हाला हे रितसर भूखंड दिले आहेत. या मागे कोणाची मेहरबानी नाही. आमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त सक्षम आहोत. मात्र कुणी बाहेरच्या गावातील व्यक्ती आमच्यात गटतट निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. पिळणकर यांनी दिला. जलजीवनमधून आमच्या गावठणासाठी मंजूर 46 लाखाची नळ योजना राबविताना अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आम्हांला विश्वासात घेतलेले नाही. सदर योजनेची विहीर लोरे गांधीवाडीत असून या योजनेवरूनच गांधीवाडीला पाणी पुरवठा करण्याचा काही जणांचा हेतू आहे. मुळात नवीन कुर्ली वसाहतीला गेली 12 वर्षे नियमित मुबलक व मोफत पाणी पुरवठा होत असून आम्हाला पर्यायी नळयोजनेची आवश्यकता नाही. तरी प्रशासनाने नव्याने प्रस्तावित नळयोजना रद्द करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. बाहेरील राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळेच प्रकल्पग्रस्तांमुळेच गटतट निर्माण झाले असून स्वतंत्र ग्रा. पं. चा प्रस्ताव अशा झारी शुक्राचार्यांमुळेच रखडल्याचा आरोप त्यांनी केला.