सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेने केलेल्या कर वाढीबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. मुख्याधिकारी यांनी याची कल्पना सुद्धा मला दिली नव्हती. ही कर वाढ वाजवी आहे की कसे ? याबाबत मी खात्री करणार आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी येणारा खर्च वसूल होईल, एवढा कर वसूल करण्यास काही हरकत नाही. त्यापेक्षा जास्त असल्यास माझा विरोध राहणार आहे, अशी माहिती स्थानिक आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, आता आपण दोन कोटी नगर पालिकेला दिले आहे. त्यातून सावंतवाडी शहराला २४ तास पाणी येवू शकते. मोठी नळ योजना घेतल्यास तीन ते चार कोटी रुपये भरावे लागतील. तेवढी आर्थिक क्षमता सध्या नगर पालिकेची नाही. कामाच्या व्यापामुळे मी लक्ष देवू शकलो नाहीतरी पूर्ण पैसे मी दिलेले आहेत. त्यातून भाजी मार्केट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, योगा सेंटर उभे राहणार आहेत. नाले बंदिस्त करण्याचे काम केले जाणार आहे. थांबलेल्या ड्रेसिंग रूम साठी पैसे दिलेले आहेत, असे ते म्हणाले.
सावंतवाडी मोती तलाव हे अस्तित्व आहे. मी नगराध्यक्ष असताना येथील सर्व अतिक्रमणे हटविली होती. आठवडा बाजार हलविताना येथील अस्तित्वाला धोका येणार नाही. नागरिकांवर अन्याय होणार नाही. स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत हा प्रश्न सोडविला जाईल. नवीन मार्केट बांधण्यासाठी सुचविलेल्या जागांवर व्यापाऱ्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. यासाठी लागणारा निधी आपण आमदार फंडातून देणार आहोत. थेटर दुरुस्त रसाठी निधी दिलेले आहेत. महिलांना रोजगार मिळावा यासाठी सिंधू रत्न विकास योजनेतून निधी दिलेला आहे. मला वेळ मिळत नसल्याने मी उपस्थित राहत नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. भविष्यात आठवड्यातून एक दिवस उपस्थित राहण्याचा निर्णय आपण घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, मोती तलावातील भरवण्यात येणारा आठवडा बाजार हा अन्य ठिकाणी हलवण्यात येणार असून मोती तलावाच्या सौंदर्याला कोणतेही बाधा घडेल असे कोणते कृत्य आणू देणार नाही असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.